चुनावी जुमला... उमेदवाराने झळकावले ‘बायको पाहिजे’चे पोस्टर! दाखल झाला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:14 AM2022-01-31T08:14:31+5:302022-01-31T08:15:29+5:30
तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले.
औरंगाबाद : तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने अनधिकृत पोस्टर लावणाराविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
रमेश विनायकराव पाटील याने रविवारी सकाळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट या भागात एकसारख्या मजकुराचे पोस्टर लावले. त्यावर ‘औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२’ असे ठळक अक्षरात लिहून त्या खाली ‘मला तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय २५ ते ४० असावे. अविवाहित, विधवा, घटस्फाेटीत चालेल. फक्त दोन अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही’, असा मजकूर होता. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले. महिलांनी त्यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पैठणगेट गाठले. भाजप कार्यकर्ता अजय चावरिया यांनी पोस्टरला काळे फासले.
रमेश पाटीलचा चावटपणा
या पोस्टरची चर्चा शहरभर होवू लागलेली असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास रमेश पाटील पैठणगेटवर आला. त्याने पोस्टरसोबत चक्क फोटो काढले.
आपण मनसेचा कार्यकर्ता असून, कोणत्याही पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली, तर आपण लढायला तयार असल्याचे यावेळी तो म्हणाला.
मनपा, पोलीस यंत्रणा काय करते?
n शहरात तीन ठिकाणी चुकीचा संदेश देणारा मजकूर असलेले पोस्टर झळकत असताना पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न भाजपच्या मनीषा मुंडे यांनी उपस्थित केला.
n महिलांची अब्रू वेशीवर टांगण्याचा अधिकार रमेश पाटील याला कोणी दिला.
n महिलांचा अपमान केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.