जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुक "ऑनलाईन" पद्धतीनेच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 02:12 PM2021-03-17T14:12:04+5:302021-03-17T14:15:22+5:30
Jalgaon Municipality Mayor-Deputy Mayor Election रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ''ऑनलाईन'' निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते.
औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकी साठी ''ऑनलाईन'' ऐवजी ''सभागृहात प्रत्यक्ष मतदान '' घ्यावे यासाठी दाखल याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने कुठलीही स्थगिती दिली नाही. परिणामी उद्या दि.१८ मार्च रोजीची महापौर व उपमहापौरांची निवडणूक '' ऑनलाईन'' पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे .
बुधवारी (दि.१७ मार्च) न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली. रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ''ऑनलाईन'' निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते. राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे असी विनंती त्यांनी केली होती. नुकतीच पिंप्री चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाईन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमरजितसिंह गिरासे, अॅड. योगेश बोलकर, अॅड ज्ञानेश्वर बागुल व अॅड. विष्णू मदन पाटील यांनी तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे यांनी काम पाहिले .