निवडणुका कायद्याच्या कचाट्यात, इच्छुकांचा ‘नॅनो गुढ्या’ वाटपातून संपर्क वाढविण्यावर भर
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 18, 2023 12:23 PM2023-03-18T12:23:32+5:302023-03-18T12:25:20+5:30
बाजारात विक्रीला आलेल्या ‘नॅनो गुढी’ राजकारण्यासाठी प्रचाराच्या आधार बनल्या आहेत.
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : सध्या मनपाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत; पण नगरसेवकपदी आरूढ होण्यासाठी इच्छुकांनी आता गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत अधिकाधिक संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने ‘नॅनो गुढ्यां’चे वाटप वॉर्डात करण्याचे ठरवले आहे. यामुळे नॅनो गुढ्यांचे बुकिंग वाढले असून निवडणुका जरी कायद्याच्या कचाट्यात अडकल्या असल्या तरी ‘नॅनो गुढ्या’ची चर्चा जोमात आहे.
गुढी पाडवा सण बुधवारी, २२ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून शोभेच्या रेडिमेड नॅनो गुढ्या बाजारात विक्रीला येत आहे. यंदाही या सुंदर गुढ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. घरासमोर सर्वांना दिसेल अशा उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. तसेच वर्षभर शोकेसमध्ये ठेवण्यासाठी शोभेच्या गुढ्याही हौशीने घेतल्या जातात. राजकारणी हे काळाची पावले ओळखणारे असतात. सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी निवडणूक लवकर व्हावी, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. काहींनी तर आतापासून विविध मार्गाने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात महत्त्वाचा सण ‘गुढी पाडवा’ हा सण कॅच करण्यासाठी काही जवळचे कार्यकर्ते, काही मतदारांना नॅनो गुढी भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार विक्रेत्यांकडे ऑर्डर देणेही सुरू झाले. खास मर्जीतील कार्यकर्ते, अधिकारी यांना काचेतील नॅनो गुढी देण्यासाठी सरसावले आहेत. यामुळेे इच्छुकांमुळे गुढ्यांचा बाजार जोमात आहे. अशी माहिती नॅनो गुढी डिझायनर नीलेश मालानी यांनी दिली.
रेडिमेड गुढ्यांना चढला भाव
तांबे महागल्यामुळे नॅनो गुढीवर ठेवण्यात येणारा तांब्याचा गडू २० रुपयांनी महागला, तर रेडिमेड नॅनो गुढीचे भाव दीडपटीने वाढले आहे. ६ इंचांच्या गुढीला ७५ रुपयांना, ९ इंचांची गुडी १०० रुपयांना, तर १२ इंची गुढी १२० रुपयांना प्रति नग विकत आहेत. तर काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेली ८ इंचांची गुढी १७५ रुपयांना मिळत आहे.