सभापतीपदाची निवडणूक २ जूनला
By Admin | Published: May 23, 2016 11:56 PM2016-05-23T23:56:32+5:302016-05-24T01:19:12+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच विषय समित्यांच्या
औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांची नियुक्ती केली आहे.
महापालिकेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मनपा स्थायी समिती सभापती निवडीकडे लागले आहे. स्थायीमधील १६ पैकी ८ सदस्य ३० एप्रिल रोजी नियमानुसार निवृत्त झाले. त्यानंतर १० मे रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत रिक्त सदस्यांच्या जागेवर पक्षनिहाय नवीन सदस्य निवडण्यात आले. मनपाच्या नगर सचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २ जून रोजी स्थायी समिती व पाच विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवडणूक होणार आहे. सकाळी १० वाजता स्थायी समितीची, तर त्यानंतर ११ वाजता पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक होणार आहे.
शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार यंदा सभापतीपद सेनेच्या वाट्याला आले आहे. स्थायी समितीमध्ये सेनेचे सहा सदस्य आहेत. स्थायीत जाण्यासाठी यंदा सेनेतील दिग्गज नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन आणि राजू वैद्य यांनी कसोशीने प्रयत्न केले. पक्षश्रेष्ठींनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले सीताराम सुरे यांच्यावर विश्वास दाखविला. आता सभापतीपदासाठी सेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवक मोहन मेघावाले यांच्यासह सीताराम सुरे यांनीही कंबर कसली आहे. नवीन चेहरा देण्याचा विचार पक्षाने केल्यास मकरंद कुलकर्णी, रावसाहेब आमले यांचा क्रमांक लागू शकतो.