सतर्कतेने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी
By | Published: November 28, 2020 04:06 AM2020-11-28T04:06:29+5:302020-11-28T04:06:29+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश ...
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी गुरुवारी येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सिंह यांनी घेतला.
सिंह म्हणाले, सर्व मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूरक व्यवस्था ठेवत सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. सर्व मतदारांना सॅनिटायझर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात यावा. सर्व मतदान केंद्राचे निजर्तुंकीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे मतदान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, नियमबाह्य गोष्टी घडणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. आक्षेपार्ह काही घडल्यास अशा प्रकारच्या घटनेची तातडीने आयोगास माहिती द्यावी. नकारात्मक गोष्टी प्रसारित होणार नाही, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी घडणार नाही, यासाठी यंत्रणांनी खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना पुरेशी माहिती यंत्रणांनी देऊन जनजागृती करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना सिंह यांनी दिल्या. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह इतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.