पैठण तालुक्यात खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच, उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:05 AM2021-02-13T04:05:01+5:302021-02-13T04:05:01+5:30
पैठण : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदांची निवडणूक शुक्रवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान, विहामांडवा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या ...
पैठण : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदांची निवडणूक शुक्रवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान, विहामांडवा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीसाठी बोलावलेल्या सभेला कोरमपूर्ती न झाल्याने तेथील सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
पैठण तालुक्यात शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सभा आयोजित केल्या होत्या. यासाठी ८६ अध्यासी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचे जोखड उतरवून अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी झाल्याचे दिसून आले. काहींनी पॅनल सोडून विरोधकांत सहभागी होत सरपंचपद पटकावल्याचेही दिसून आले. दरम्यान, ढाकेफळ, एकतुनी, आडूळ खुर्द, रांजणगाव दांडगा या गावांत आरक्षण निघालेल्या महिला सदस्य नसल्याने या ठिकाणी त्याच प्रवर्गातील पुरुष सदस्यांना सरपंचपदाची लॉटरी लागली. निवड झाल्यानंतर आपआपल्या पक्षाच्या नेत्यांकडे जाऊन नवनिर्वाचित सरपंचांनी फोटो काढले. तसेच गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, मिरवणूक काढण्यास मनाई असल्याने कार्यकर्त्यांचा मात्र मोठा हिरमोड झाला.