निवडणूक चिन्हात फळभाज्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:04 AM2021-01-03T04:04:36+5:302021-01-03T04:04:36+5:30
पाचोड : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. यंदा निवडणूक ...
पाचोड : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हे देण्याच्या दृष्टीने फळभाज्यांचा वापर केल्याने अनेकांना अशी चिन्हे मिळणार आहेत. गावनिहाय अनेकांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. अनेक गावांत दोन, तर काही ठिकाणी तीन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार आहे.
पाचोड गावासह परिसरातील पाचोड खुर्द, मुरमा, कोळीबोडखा, लिंबगाव, रांजणगाव दांडगा, आडगाव जावळे, आंतरवाली खांडी, आदी गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यासाठी अनेक गावांतील मंडळी काही उमेदवारांना गळ टाकून त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी चिन्हेसुद्धा जाहीर केली आहेत. विजयी होण्यासाठी चिन्हेसुद्धा अनेक वेळा महत्त्वाची असल्याने याकडे उमेदवारांचे लक्ष आहे. या निवडणुकीत आयोगाने भाजीपाला, फळे, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती साहित्यांसह सफरचंद, कलिंगड, द्राक्ष, ढोबळी मिरची, मका, हिरवी मिरची, शिवण यंत्र, विविध फळे व फळभाज्या उमेदवारांची चिन्हे असणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या या आखाड्यात ४ जानेवारी रोजी उमेदवारांना आपला अर्ज परत घेता येणार आहे. निवडणूक आयोगाकडून रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. उमेदवारांना आपला प्रचार करताना अख्खी भाजी मंडई, फळे, घरगुती वापराच्या साहित्यांवर मतदान करण्याचे आवाहन करावे लागणार आहे. पैठण तालुका प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शनिवारी सकाळी पाचोडला भेट देत निवडणूक होत असलेल्या गावांत प्रशासनाचे अधिक लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, उमेदवारांसह नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.