मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:50 PM2019-03-26T19:50:11+5:302019-03-26T19:50:47+5:30

१९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी असलेले भुजंगराव कुलकर्णी सांगत आहेत क्षणचित्रे

Elections I have seen .... During the second Lok Sabha election to the Collector's office, there were only two cars | मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

googlenewsNext

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यानंतरही मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. 
१९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी हैदराबादेत नोकरीला असल्यामुळे मराठवाड्यातील निवडणुकीचा जास्त संबंध आला नाही. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीला औरंगाबादचा जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी असल्यामुळे औरंगाबाद आणि जालना (तेव्हा एकच जिल्हा अस्तित्वात होता.) लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी होतो.

या निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी औरंगाबादेतील आमखास मैदान, जालना आणि जळगाव लोकसभेसाठी फर्दापूर जवळच्या एका खेड्यात प्रचार सभा घेतली. याच दौऱ्यात नेहरू यांनी वेरूळ, अजिंठा लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यांचा मुक्काम औरंगाबाद हॉटेलमध्ये होता. त्या हॉटेलमधून नेहरू यांचे जेवण, चहा, नाश्ता जालना, अजिंठ्यापर्यंत येत असे. जिल्हाधिकारी असल्यामुळे नेहरूंना लेण्या दाखविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तब्येत खराब झाल्यामुळे या दौऱ्याच्या मध्यातून जावे लागले. उमेदवार तीन-चार असल्यामुळे जास्त प्रचार वगैरे काही नसे. शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवार भेटी देत. तेव्हा प्रचार करण्यासाठी अडचणी खूप होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवघ्या दोन गाड्या होत्या. त्याच गाड्यांतून फिरावे लागे. पेट्रोल देण्यासाठी एक अधिकारी होता. त्याने कूपन दिल्यानंतरच पेट्रोल मिळत असे. निवडणुकीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रकच घ्याव्या लागत. निवडणुकीचे सामान, अधिकारी आणि कर्मचारी त्या गाड्यांमधूनच मतदानाच्या एक दिवस अगोदर गावात पोहोचत. निवडणुकीचे अतिरिक्त साहित्य घेऊन जावे लागे. कारण पुन्हा त्या गावात ऐनवेळी काहीही पोहोचवता येणे शक्य नव्हते. एक हजार मताला मतदान केंद्र होते. 

तीन-चार वाड्यांसाठी एक मतदान केंद्र दिले जाई. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत. मतदान केंद्रांना भेटी देत होेतो. आमच्या गाड्यातही निवडणुकीचे साहित्य ठेवलेले असायचे. काही अडचण आली की, ते मतदान केंद्रांवर देत असत. निवडणुकीपूर्वी केली जाणारी तयारीच महत्त्वाची असे. ऐनवेळी काहीही मिळत नसे. त्या निवडणुकीत जळगावला पाटसकर होते. औरंगाबादेत काँग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ आणि कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. मिरजकर निवडणुकीला उभे होते. यात स्वामीजी जिंकले. जालना मतदारसंघात तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीचे बाबासाहेब सवणेकर उभे होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा निवडणुकीत आचारसंहिता वगैरे असला काही प्रकार नव्हता. निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत झालेल्या चुकांमधून आगामी निवडणुकीत दुरुस्ती करीत होता. १९५७ साली केलेल्या निवडणुकीच्या कामाचे कौतुक विजयी उमेदवार स्वामी रामानंद तीर्थ आणि विरोधी उमेदवार कॉ. मिरजकर यांनी पत्र पाठवून केले होते.

- भुजंगराव कुलकर्णी, ( सेवानिवृत्त आयएएस अधिकारी)

Web Title: Elections I have seen .... During the second Lok Sabha election to the Collector's office, there were only two cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.