मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा
By विकास राऊत | Published: May 17, 2024 02:00 PM2024-05-17T14:00:29+5:302024-05-17T14:02:51+5:30
मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीचा धुराळा खाली बसला आहे. निवडणूक यंत्रणेत प्रशासकीय यंत्रणा आणि उमेदवारांच्या प्रचारात राजकीय नेते गुंतल्यामुळे विभागातील दुष्काळाकडे कुणीही पाहिले नाही. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात लावल्यामुळे सुमारे १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर भागत आहे. रणधुमाळी संपली असून, आता शासन आणि प्रशासनाने टंचाई निवारणासाठी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून पाणीटंचाईचा मध्यंतरी आढावा घेतला होता.
दुष्काळाच्या झळा, पण भाषणे उणीदुणी काढणारी
निवडणूक रणधुमाळीत दुष्काळाचा टक्का वाढला. सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव ही मुद्दे पूर्णत: गायब होते. फक्त उणीदुणी काढणाऱ्या भाषणांमुळेच मतदारांचे मनोरंजन केले.
जलसाठे आटत आहेत...
विभागातील जलसाठे आटू लागले. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.
१०९ वरून १७५८ वर गेला आकडा...
जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला.
६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले....
प्रशासनाने विभागातील २०८३ विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यात ६५१ विहिरींची संख्या वाढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४६, जालना ४६८, परभणी १५८, हिंगोली १००, बीड ३९२, नांदेड १६९, लातूर ३३३, तर धाराशिव जिल्ह्यात ८१३ विहिरींचे अधिग्रहण केले. टँकरसाठी ९००, टँकर व्यतिरिक्त १८३४ अशा २७३४ विहिरींचे अधिग्रहण केले.
जिल्हानिहाय टँकर संख्या
छत्रपती संभाजीनगर.......... ६७८
जालना.......... ४८८
परभणी.............१४
हिंगोली ..........०२
नांदेड.............. २१
बीड ..............३९९
लातूर........... २५
धाराशिव........... १३१
एकूण ...........१७५८