मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:21 PM2024-11-13T15:21:09+5:302024-11-13T15:21:32+5:30

सातत्याने येणाऱ्या कॉलला मतदार वैतागले; आपले नाव इतर मतदारसंघात तर गेले नाही ना, असा प्रश्न मतदारांना पडतो आहे.

Electors of Phulumbri Legislative Assembly; Campaign calls for candidates from Nanded, Kolhapur | मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे

मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे

लाडसावंगी : मतदार फुलंब्री १०६ विधानसभा क्षेत्राचा; मात्र प्रचार कॉल हा इतर मतदारसंघातून येत असल्याने आपले मतदान दुसऱ्या मतदारसंघात तर गेले नाही ना, अशी शंका मतदारांना येत आहे. शिवाय अवेळी प्रचार कॉल येत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लाडसावंगी जिल्हा परिषद गट हा फुलंब्री १०६ विधानसभा मतदारसंघात येतो. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार प्रचार करण्यासाठी नवनवीन टेक्नोलॉजीचा वापर करत आहेत. प्रचाराचा त्रास मात्र मोबाइलवरून येणाऱ्या रेकॉर्ड कॉलचा होत आहे. हा कॉल सकाळी ७ वाजेच्या आत व रात्री ८ वाजेनंतर येत आहे. आपले मतदान तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आहे, मग नांदेड, कोल्हापूरसह इतर मतदारसंघातून प्रचाराचे रेकॉर्ड कॉल का येत आहेत.

आपले नाव इतर मतदारसंघात तर गेले नाही ना, असा प्रश्न मतदारांना पडतो आहे. ग्रामीण भागात सध्या शेतीच्या कामात मतदार व्यस्त आहेत. कापूस वेचणी रबी पेरणी व पिकाला पाणी भरणे आदी कामांत मजूर व शेतकरी व्यस्त आहेत. यात दिवसभर थकूनभागून आलेल्या मजुराला अवेळी प्रचार कॉल येत असल्याने मतदार जाम वैतागले आहेत. एकदाची कधी विधानसभा निवडणूक पार पडते अन् हे प्रचाराचे रेकॉर्ड कॉल बंद होतात, असे मतदारांना झाले आहे. आधीच दिवसभरात चार- पाच कॉल हे विविध कंपन्यांचे येतात, त्यात निवडणूक कॉल वाढले आहेत. मोबाइल आपल्या सुविधेसाठी आहे, की कंपनी अन् निवडणूक प्रचारासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नांदेडमधून कॉल
मला गेल्या दोन दिवसांपासून नांदेड मतदारसंघाचे प्रचार कॉल येत आहेत. कधी सकाळी ७ वाजता, तर कधी रात्री ८ वाजता.
-विनोद पडूळ, लाडसावंगी

कोल्हापूरमधून कॉल
मला कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार कॉल आले. मला वाटले, माझे नाव व मतदान कोल्हापूर मतदारसंघात तर गेले नाही ना.
-विलास पवार, लाडसावंगी

Web Title: Electors of Phulumbri Legislative Assembly; Campaign calls for candidates from Nanded, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.