चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:33 PM2019-04-29T23:33:10+5:302019-04-29T23:33:47+5:30
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत.
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. तसे झाले तर औरंगाबादेत औद्योगिकीकरणाची सुरुवात करणारे पहिले औद्योगिक क्षेत्र नामशेष होण्याची चिंता ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
उद्योगांना वीजपुरवठा ही सर्वात महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योगांना महावितरणकडून ही सुविधा पुरविली जाते. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात मुख्यत: रेडियंट अॅग्रो, इंडस्ट्रियल १ व २, एलोरा या फिडरवरील वीजपुरवठा गेल्या दोन वर्षांपासून दररोज तासन्तास खंडित होत आहे. हे फिडर खंडित वीजपुरवठ्यासाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. या फिडर्सवरील ट्रान्सफॉमर्स, केबल्स, वीजवाहिन्या या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होतात आणि वीजपुरवठा बंद होतो. यातून या फिडरवर जोडलेले उद्योग दररोज किमान २ ते ३ तास बंद पडतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होते. यंत्रसामग्रीचेही नुकसान होते. या सगळ्या परिस्थितीत कामगारांचे वेतन मात्र, द्यावेच लागते. त्यामुळे उद्योगांना दोन्ही बाजंूनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे येथील उद्योग इतरत्र हलविण्याचा विचारही उद्योजक करीत आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येक डे गांभीर्याने लक्ष द्यावे. भविष्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि येथील उद्योगांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे, माजी अध्यक्ष किशोर राठी, पदाधिकारी अभय हंचनाळ, मनीष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी, भगवान राऊ त, विक्रम डेकाटे, कुंदन रेड्डी आदींनी केले आहे.
वीजपुरवठ्यानुसार कामाचे नियोजन
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मसिआ’ संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक वेळी अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळते; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, वीज खंडित होईल, हे गृहीत धरूनच दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे लागत आहे. त्यातून अपेक्षित उत्पादन होत नाही. पायाभूत सुविधांअभावी चिक लठाणा औद्योगिक वसाहतीची वाताहत होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.