छत्रपती संभाजीनगरहून विजेवर मालगाड्या धावताहेत, लवकरच प्रवासी रेल्वेही धावेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:56 PM2023-05-06T12:56:29+5:302023-05-06T12:56:42+5:30
वर्षाअखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचेही काम लवकरच
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया संबंधित विभागाकडून होणार असून, वर्षाअखेरपर्यंत रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात होईल. सध्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक सुरळीत होताच प्रवासी रेल्वेही विजेवर चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह प्रवासी रेल्वे धावताना दिसेल. तर डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या.
'डीआरएम'पदी रुजू झाल्यानंतर नीती सरकार यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर सोयीसुविधांची पाहणी केली. रेल्वेस्टेशनवर आगामी कालावधीत कोणत्या प्रवासी सुविधा वाढणार आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. रेल्वेस्टेशनची पाहणी केल्यानंतर नीती सरकार यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वे विभागाच्या माल वाहतुकीसंदर्भातील विविध योजनांची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. उद्योजकांच्या रेल्वेकडून अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष नितीन गुप्ता, अर्पित सावे, आशिष गर्दे, शिवप्रसाद जाजू, मिलिंद कंक, विनायक देवळाणकर, राजेंद्र मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.
विद्युतीकरणाची काय स्थिती?
पत्रकारांशी बोलताना निती सरकार म्हणाल्या, मनमाड ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर ते करमाड टप्पाही झाला असून, करमाड ते जालना दरम्यानचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक व्यवस्थित झाल्यानंतर प्रवासी रेल्वेही विद्युतीकरणावर चालविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
अचानक दौरा, अस्वच्छतेविषयी कानउघाडणी
नीती सरकार यांचा हा दौरा गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर त्या दाखल झाल्या. अगदी सकाळीच रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी येताच जागोजागी अस्वच्छता पाहून त्या चांगल्याच भडकल्या. अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत साफसफाई करून दुरवस्था दूर करण्यास सांगितले.