विजेच्या कमी दाबाने विद्युत उपकरणे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:36 PM2019-07-02T22:36:57+5:302019-07-02T22:37:25+5:30
रात्री कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा झाल्यामुळे या सोसायटीतील अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटला घडली.
वाळूज महानगर : सिडको कार्यक्षेत्रात व तीसगाव ग्रामपंचायत हद्दीतील सारा विहार सोसायटीत सोमवारी रात्री कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा झाल्यामुळे या सोसायटीतील अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटला घडली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप या सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
सारा विहार या सोसायटीत २४ कुटुंब वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास या सोसायटीत कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा होऊन काही वेळाने वीज पुरवठा खंडीत झाला. यामुळे या सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरातील पंखे, कुलर,टीव्ही, फ्रिज, ट्युबलाईट, बल्ब इत्यादी विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत.
दरम्यान, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर तासभरात पुन्हा वीज पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. या सोसायटीतील नागरिकांनी मंगळवारी सकाळी महावितरणच्या सिडको कार्यालयास या प्रकाराची माहिती दिली. यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुसºया खांबावरुन जोडणी दिल्यानंतर या सोसायटीतील वीज पुरवठा पूर्ववत झाला.
महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे या सोसायटीत विद्युत उपकरणे नादूरुस्त झाल्याचा आरोप सुनिल बडजाते, मनिष जैन, सोनु शर्मा, अमित जैस्वाल आदींनी केला आहे. या विषयी महावितरणचे उपअभियंता सचिन उखंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.