पुढील वर्षी जालन्याहून धावणार इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:52 PM2022-04-15T18:52:51+5:302022-04-15T18:53:59+5:30
लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान ५ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण संस्थेने (सीओआरई) देशभरातील रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य (टार्गेट) प्रसिद्ध केले आहे. यातून जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरण पुढील वर्षाच्या प्रारंभी पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अंकाई ते परसोडा दरम्यान काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत २६ मार्च रोजी चाचणी घेण्यात आली. यावेळी ताशी १०० किमीच्या वेगाने इलेक्ट्रिक इंजिन धावले. आता फेब्रुवारी २०२३ जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
वेळेवर काम पूर्ण व्हावे
औरंगाबाद - रोटेगाव रेल्वे मार्गाचे सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद - जालना रेल्वे मार्गाचे फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आशा आहे की, कंत्राटदार कंपनी हे काम वेळेत पूर्ण करेल आणि लवकरच औरंगाबादवरून विद्युत इंजिनवर रेल्वे धावतील.
-स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक