विद्युत पोलअभावी वीजपुरवठा ठप्प
By Admin | Published: June 16, 2014 11:53 PM2014-06-16T23:53:01+5:302014-06-17T01:12:45+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना मृग नक्षत्रापूर्वी ६ जून रोजी झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला.
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना मृग नक्षत्रापूर्वी ६ जून रोजी झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला. यात शिवारातील अनेक विद्युत पोल उखडून पडले. परंतु, अद्यापि तेथे नवीन पोल बसविण्यात आले नसल्याने विद्युत पोलअभावी वीजपुरवठा ठप्प झाला असून, विद्युत पोल मिळविण्यासाठी बळीराजाचे महावितरण गट कार्यालयास खेटे घालणे सुरूच आहे. विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंपसुद्धा बंद आहेत.
मार्च महिन्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वच गावास सलग १८ दिवस गारपिटीने झोडपले होते. तेव्हासुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल मोडून पडले होते. त्याची दुरुस्ती होते न होते तोच जून महिन्यात पुन्हा वादळी पाऊस झाला आणि त्याचा हालकी, उजेड, सय्यद अंकुलगा, बाकली, तळेगाव (बो.), डोंगरगाव आदी गावांना फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल झुकले. काही ठिकाणी मोडून पडले. विजेच्या तारा लोंबकळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीचा विद्युत पुरवठा ठप्प झाला. परिणामी, विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शेतकरी महावितरणच्या गट कार्यालयास खेटे घालीत आहेत. तरीही महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन विजेची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. (वार्ताहर)
साहित्य मिळेना...
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मरला फ्यूज नाहीत. चिमण्या नाहीत. केबल मिळत नाहीत. झुकलेल्या तारा अडचण करीत आहेत. या तडजोडीच्या साहित्यावाचूनही अनेक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शिवाय, या छोट्या-छोट्या वस्तूमुळे कृषीपंप बंद पडत आहेत.
सहाय्यक अभियंता युसुफोद्दीन शेख म्हणाले, मागणीप्रमाणे लाईनमनच्या शिफारशीवरून विद्युत पोल, विद्युत साहित्य देण्यात येत आहे.