वीजबिल वाढीचा बसेल झटका: १०० युनिटपर्यंत वापराल तरच परवडेल! वाढीव दर लागू
By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2023 08:41 PM2023-04-18T20:41:49+5:302023-04-18T20:41:56+5:30
वीजबिलात वाढ, उन्हाळ्यात बसणार फटका
छत्रपती संभाजीनगर : राज्यात ग्राहकांना एप्रिल महिन्यातील वीजवापराचे बिल नव्या दराने येणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होणार असून, ज्या ग्राहकांचा वापर शंभर युनिटपर्यंत आहे, त्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. त्यामुळे वाढीव दरामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरली तरच परवडणार आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत विजेचे दर अधिक असतानाही पुन्हा दरवाढ करू नये, अशी ग्राहकांची मागणी होती. परंतु आयोगाने दरवाढीच्या बाजूने कौल दिल्याने ग्राहकांना जादा वीजबिल येणार आहे. वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या वीज दरवाढीनंतर ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होणार असल्याने त्यांना भुर्दंड बसणार आहे. १०० युनिट वापरणाऱ्यांना ३८ रुपये म्हणजे ५ टक्के वीजदरवाढ करण्यात आली आहे.
१०१ पासून प्रतियुनिटसाठी २ रु. ३० पैशांची वाढ
महावितरणकडून दरवाढीचा प्रस्ताव तूट भरण्यासाठी देण्यात आल्यानंतर आयोगाने प्रतियुनिट २ रुपये ५५ पैसे इतकी दरवाढ सुचविलेली होती. आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार ही दरवाढ आता २ रुपये ३० पैसे इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे १०१ पासून प्रति युनिट २ रुपये ३० पैसे जादा द्यावे लागतील.
असा असेल फरक (₹)
प्रकार - १०० युनिटसाठी आधी - १०० युनिटसाठी नंतर
स्थिर आकार -१०५ -११६
वीज आकार -३.३६ - ४.४१
वहन आकार -१.३५ - १.१७
इंधन समायोजन- ०.६५ --
शंभर युनिटपर्यंत प्रति युनिट १ रुपये ०७ पैशांची वाढ
ज्या वीज ग्राहकांचा वापर शंभर युनिट आहे, त्यांना पाच टक्के दरवाढीसुनार ३८ रुपये जादा वीजबिल येणार आहे. जे ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात त्यांना कमी युनिट वापरण्याचा फायदा होणार आहे.
वीजबचत हाच पर्याय
वाढीव वीजदराचा मोठा फटका ग्राहकांना बसणार असल्याने विजेची बचत हाच पर्याय समोर आहे. शंभर युनिटच्या जवळपास अडीच रुपये प्रति युनिट फटका बसणार असल्याने शंभर युनिटच्या आत वीज वापर पर्याय ग्राहकांपुढे आहे. उन्हाळ्यात वीज युनिट वापर वाढणार, तर इतर काळात बचत गरजेचे आहे.
विरोधानंतरही दरवाढ लागूच
घरगुती विजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक तूट भरण्यासाठी महावितरण कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातून वीजदरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळीही महाराष्ट्राची वीजदरवाढ ही इतर राज्यांच्या तुलनेत अगोदरच अधिक असताना, पुन्हा दरवाढ करू नये, यासाठी विरोध करण्यात आला.