४५,००,००० वीज बिल थकले; एक वर्षापासून दयनीय स्थितीतील वंदे मातरम् सभागृह बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:57 IST2025-01-16T16:56:54+5:302025-01-16T16:57:38+5:30
महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच हे सभागृह चालविण्यासाठी ताब्यात द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, हे विशेष.

४५,००,००० वीज बिल थकले; एक वर्षापासून दयनीय स्थितीतील वंदे मातरम् सभागृह बंद!
छत्रपती संभाजीनगर : ३४ कोटी रुपये खर्च करून किलेअर्क येथे वंदे मातरम् सभागृह उभारण्यात आले. या सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली. परंतु मागील वर्षभरापासून सभागृहाला चक्क कुलूप ठोकण्यात आले. सभागृहाचे वीज बिल ४५ लाख रुपये थकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच हे सभागृह चालविण्यासाठी ताब्यात द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, हे विशेष.
सिडको प्रशासनाने किलेअर्क येथे वंदे मातरम आणि बाजूलाच हज हाऊसचे निर्माण केले. दोन्ही प्रकल्पांवर जवळपास ७० ते ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हज हाऊस सुरू असले तरी देखभाल करणे अवघड जात आहे. मागील पावसाळ्यात सभागृह अनेक ठिकाणी गळत होते. ध्वनिक्षेपण यंत्रणा नाही. व्यासपीठावरील खुर्च्याही संयोजकांना बाहेरून आणाव्या लागतात. याला लागूनच असलेल्या वंदे मातरम् सभागृहाची अवस्था त्यापेक्षाही वाईट आहे. मागील वर्षभरापासून हे सभागृह बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभागृहाचे भाडे अवाढव्य ठेवले की, ते कार्यक्रमासाठी कोणीही घ्यायला तयार नाही. त्यातच आता विजेचे बिल ४५ लाखांपर्यंत पोहोचले. महावितरण कार्यालयाने वीज कापल्याचीही चर्चा असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग कोणालाही सभागृह भाडेतत्त्वावर देण्यास तयार नाही.
मनपाचा प्रस्ताव धुडकावला
महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी वंदे मातरम् सभागृह चालविण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करावे. खासगीकरणातून हे सभागृह चालविले जाईल. नागरिकांना सुविधा होईल, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही.
संत एकनाथ रंगमंदिर
उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिरावर मनपाने कोट्यवधी रुपये खर्च केले. सभागृह चालविण्यासाठी खासगी एजन्सीला दिले. विविध कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत. त्यातून मनपाला उत्पन्नही मिळत आहे. मात्र, काही खुर्च्यांची मोडतोड झाली आहे.