"वीज जोडणी खंडित होईल"चे ग्राहकांना मेसेज; लुबाडण्यासाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा
By साहेबराव हिवराळे | Published: May 23, 2024 07:41 PM2024-05-23T19:41:11+5:302024-05-23T19:41:43+5:30
ग्राहकांनी बनावट संदेशापासून सावध राहा, महावितरणचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : सायबर भामट्यांनी आता आपला मोर्चा औद्योगिक वीज ग्राहकांकडे वळविला आहे. बनावट संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.
भामटे खोटे मेसेज करून महावितरण ग्राहकांना लुबाडत आहेत. महावितरणच्या जनजागृतीमुळे त्याला आळा बसल्यानंतर आता औद्योगिक ग्राहकांकडे भामट्यांनी नवा फंडा हुडकला. केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या बनावट लेटरहेडवर ग्राहकांना पत्र व बनावट फोन नंबर पाठविण्यात येत आहेत. ‘प्रिय ग्राहक, तुमची वीजजोडणी रात्री ९ वाजता खंडित करण्यात येणार आहे. कारण तुम्ही या महिन्याचे वीज बिल भरले नाही. तत्काळ वीज कार्यालयाशी संपर्क करा. तसेच विद्युत कार्यालयातील सोशल मीडिया अकाउंटवर संपर्क साधावा’, असा यात मजकूर असतो. सोबत खोटा अकाउंट नंबरही असतो. वीज ग्राहकाने संपर्क साधताच मोबाईल व अकाऊंटवर संपूर्ण ताबा मिळवला जातो अन् क्षणात बँक खाते साफ केल्याच्या घटना घडत आहेत.
अनोळखी ॲप अथवा लिंक डाऊनलोड करू नये..
महावितरणचे एकच अधिकृत संकेतस्थळ असून यामध्ये ग्राहक सेवेसाठी कंझ्युमर ॲपवरून सेवा दिल्या जातात. वीज बिल वसुलीसाठी सोशल मीडियावर कोणताही संदेश दिला जात नाही. आपली फसवणूक झाल्यास ग्राहकांनी तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ग्राहकांनी कोणतेही अनोळखी ॲप अथवा लिंक डाऊनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये. काही शंका आल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
-राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक.