शाळेच्या शेडमध्ये उतरला वीज प्रवाह; शिक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला पडेगाव शाळेतील अनर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:47 PM2018-01-24T14:47:46+5:302018-01-24T14:48:17+5:30
पडेगाव येथील एका खाजगी संस्थेच्या शाळेच्या लोखंडी शेडमध्ये वीज प्रवाह उतरला होता; परंतु शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
औरंगाबाद : पडेगाव येथील एका खाजगी संस्थेच्या शाळेच्या लोखंडी शेडमध्ये वीज प्रवाह उतरला होता; परंतु शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजता घडली.
लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये वीज प्रवाह उतरल्याची माहिती जेव्हा नागरिकांना कळाली तेव्हा एकच गर्दी झाली होती. ५९ लहान मुले शाळेत होती. शाळेच्या शिक्षिका अरुणा चोपडे, तृप्ती बैरागी, वर्षा इंगळे, सोमनाथ पवार, कारभारी गायकवाड, सुरेश पवार यांनी प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील मैदानात सुरक्षित नेले.
घटनेची माहिती छावणी महावितरण कार्यालयाला कळविल्याने तेथील वीज प्रवाह त्वरित खंडित करण्यात आला. हा प्रसंग ओढावला होता तेव्हा शाळेत ६० ते ७० मुले होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालकांनीही शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला. महावितरणचा टॉवर डीपी शाळेच्या भिंतीलगत व पत्र्याच्या शेडला लागूनच आहे. तेथे सकाळी एका ट्रॅक्टरची धडक लागल्याने खांब वाकला आणि शाळेच्या लोखंडी शेडला तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे हा प्रसंग ओढावला होता.
अज्ञात वाहनाचा धक्का
अज्ञात ट्रॅक्टरचा खांबाला धक्का लागल्याने तो खांब बाजूला असलेल्या इमारत व पत्र्याच्या शेडला टेकला होता. ‘त्या’ ट्रॅक्टरचालकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहेत.
- एस. डी. जाधव, सहा. इंजिनिअर, महावितरण कार्यालय, छावणी
लाकडाने दरवजा उघडला
तार वाकलेली लक्षात आली. आम्ही त्वरित मुले बाहेर काढायला सुरुवात केली. गेटला हात न लावता लाकडाने गेट उघडले व मुले मैदानात सुरक्षित काढली. दोन तासांनी महावितरणचे कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी आले. पालकांना फोन करून आम्ही त्यांच्या पाल्य पालकांकडे सुपूर्द केले.
- अरुणा चोपडे, मुख्याध्यापिका