मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांना वीज सबसिडी चालूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 01:06 PM2021-06-12T13:06:10+5:302021-06-12T13:13:25+5:30
यापुढे जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येणार
औरंगाबाद: विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना दिली जाणारी वीज सबसिडी चालूच राहणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. उद्योगांची सबसिडी बंद केलेली नाही. एका जिल्ह्यात एका विशिष्ट उद्योगाला सबसिडीचा मोठा वाटा दिल्याची तक्रार आली होती. ही सबसिडी उद्योग वाढीला चालना देण्यासाठी दिली जाते. ती बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे सध्या नवीन वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा विचार नाही. यापुढे जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यात २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे राऊत म्हणाले.
सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात सौर ऊर्जेचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहेत. विद्युत निर्मितीसाठी आपल्याकडे दूर अंतरावरून कोळसा आणावा लागतो. त्यामुळे कोळशाच्या वाहतुकीचा थोडा खर्च वाढतो. त्यावर दरवाढ अवलंबून नसते. वीज दरवाढीचा निर्णय ऊर्जा विभाग घेत नाही. तो निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग हा घेत असतो. आम्ही वीजमाफी देऊ शकत नाही. वीजमाफी देण्याचा निर्णय राज्य तसेच केंद्र सरकार घेऊ शकते. केंद्र सरकारने भूमिका घेतल्यास नागरिकांना सोयी-सवलती देता येतील.