नांदेड- मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाचे मार्चमध्ये उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:02 AM2021-02-22T04:02:11+5:302021-02-22T04:02:11+5:30
या निमित्ताने रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यातील खासदारांशी संवाद साधणार आहेत. चिकलठाणा येथील पिट लाईन ...
या निमित्ताने रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यातील खासदारांशी संवाद साधणार आहेत.
चिकलठाणा येथील पिट लाईन बाबत रेल्वे मंत्रालय सकारात्मक असून ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्गाची कामे लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने पुलाच्या बांधकामाचा खर्चाचा आपला हिस्सा देण्याबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती कराड यांनी यावेळी दिली.
रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुमित शर्मा, व्यवसाय व कार्यान्वयन संचालक पुर्मैडू मिश्रा, रेल्वे पायाभूत सुविधा बोर्ड संचालक प्रदीपकुमार, रेल्वे पूल कार्यकारी संचालक सिंघल यांच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर ही पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असल्याचे सांगत कराड म्हणाले की, रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या भागीदारीतून रेल्वे पुलाची सर्व कामे करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव सचिन चिवटे यांचे त्याबाबत पत्र आले असून शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी ३८.६० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार आपला हिस्सा देणार आहे.
मुकुंदवाडी शरणापूर भुयारी पुलाच्या कामांची मान्यता मिळाली आहे. करमाड पुलाच्या नकाशासही मान्यता मिळाली आहे. तसेच औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाठीमागील बाजूने प्रवाशांना थेट स्थानकात येण्यासाठी नवीन गेट व तिकीट खिडकी सुरू होणार आहे. या सुविधेचा लाभ वाळूज, पैठण, बीड बायपासकडून येणाऱ्या प्रवाशांना होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, समीर राजूरकर, बापू घडमोडे, राजेश मेहता, अनंत बोरीकर, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती.