आर्थिक कोंडी फोडण्याची इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:02 AM2021-05-30T04:02:56+5:302021-05-30T04:02:56+5:30
औरंगाबाद : मार्च ते मे या हंगामात वर्षातील ४० टक्के उलाढाल होत असते. सलग दुसऱ्या वर्षी याच काळात लॉकडाऊन ...
औरंगाबाद : मार्च ते मे या हंगामात वर्षातील ४० टक्के उलाढाल होत असते. सलग दुसऱ्या वर्षी याच काळात लॉकडाऊन लावल्याने इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोट्यवधींचे कर्ज, ८० टक्के उत्पादने विक्रीविना शिल्लक, उत्पन्न शून्य पण देणी मोठी यामुळे व्यापारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी टीव्ही डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १६० इलेक्ट्रॉनिक्सची शोरूम आहेत. त्यातील १०० शोरूम शहरात आहेत. मागील दोन महिन्यांत उन्हाळा, लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षयतृतीया हे मोठे सण हातचे गेले. मार्च ते मे दरम्यान २५ ते ३० हजार कुलर, ५ ते ६ हजार एसी व १५ ते २० हजार नग फ्रीज विकले जातात. मात्र, यातील ८० टक्के उत्पादने आता वर्षभर सांभाळण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वितरकावर १ ते ५ कोटी दरम्यान किंवा त्यापेक्षा अधिकचे बँक कर्ज आहे. उत्त्पन्न ठप्प पण दुकान, गोदाम भाडे, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, अन्य करांचे बिल सुरूच आहे. सलग दोन वर्षांतील हंगाम बुडाल्याने इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस वितरक उलाढालीच्या बाबतीत तीन ते चार वर्षे मागे गेले आहेत. पुढे कसे होणार या विचाराने अनेक जण मानसिक तणावात आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून, आता १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत किंवा दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत यापैकी एक वेळ निश्चित करावी, अशी मागणी इलेक्ट्रॉनिक्स वितरक करीत आहेत.
चौकट
१२ लहान इलेक्ट्रॉनिक्स दुकाने झाली बंद
आता मागील वर्षीचे व यंदाचे कुलर, एसी, फ्रीज वर्षभर सांभाळून ठेवण्याची वेळ आली आहे. शहरात सुमारे १२ लहान, मध्यम इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांनी आपली भाड्याची दुकाने खाली करून व्यवसाय बंद केला आहे. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी आता दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. नसता आणखी काही दुकाने येत्या काळात बंद होतील. याचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात घ्यावे.
- संजय संघवी, अध्यक्ष, टीव्ही डीलर्स असोसिएशन
----
दुकानाच्या चाव्या प्रशासनाला देऊ
मागील वर्षी व यंदा ऐन हंगामात म्हणजे मार्च ते मे दरम्यान लॉकडाऊन लागले. याच काळात वर्षातील ४० टक्के उलाढाल होत असते. ही उलाढाल ठप्प आहे. आता देणी व कर्ज जास्त झाले आहे. १ जूनपासून शोरूम उघडण्यास परवानगी दिली नाही तर ते शोरूम सांभाळण्यासाठी आम्ही चाव्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करू.
संजय कोरे
संचालक, श्री डिस्ट्रीब्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स
---
उलाढालीत चार वर्षे पाठीमागे गेलो
सलग दुसऱ्या वर्षी मार्च ते मे महिन्यात लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. दिवाळीत चार दिवसांत जेवढी विक्री होते ती नुसती गुडीपाडव्याच्या एका दिवसात होते. यावरून या गेलेल्या काळात झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स वितरक उलाढालीत चार वर्ष मागे फेकलो गेलो आहोत.
अरुण जाधव, संचालक अरुण इलेक्ट्रॉनिक्स
---
कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्या
लॉकडाऊन काळात शोरूम बंद होते. ८० टक्के फ्रीज, एसी, कुलर विक्रीविना पडून आहेत. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊनच्या ३ महिन्यांच्या काळातील कर्जाचे हप्ते पुढील १२ महिन्यांत फेडण्याची मुदत द्यावी. त्यावर कोणतेही चक्रवाढ व्याज आकारू नये.
- पंकज अग्रवाल
संचालक, सानिया डिस्ट्रीब्युटर्स
---
सकाळी किंवा संध्याकाळी शोरूम उघडण्यास परवानगी द्या
इलेक्ट्रॉनिक मार्केटला सकाळी १० ते दुपारी २ किंवा दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत या दोन्ही वेळेपैकी एका वेळीस शोरूम उघडण्यास परवानगी द्यावी. कारण, आता व्यवसाय बंद करून बसणे अशक्य झाले आहे. आर्थिक कोंडीत व्यापारी अडकला आहे.
दीपक सरवदे
संचालक, सरवदे एजन्सी
---