पात्रता संगणकाची, नेमणूक मात्र गणितासाठी; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:12 PM2018-08-31T18:12:53+5:302018-08-31T18:13:30+5:30
परभणी जिल्ह्यातील श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ पूर्णा संस्थेचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत.
- राम शिनगारे
औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ पूर्णा संस्थेचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत. उच्च माध्यमिक विद्यालयात नेमलेल्या एका शिक्षकाची पात्रता एम. एस्सी. (संगणक) असताना त्यांची नेमणूक गणित विषयासाठी केली, तर दुसरा एक शिक्षक एम. ए. इंग्रजीत तृतीय श्रेणीत उत्तीर्ण असताना त्यांची नेमणूक केली. या नेमणुकीनंतर सहा वर्षांनी इम्प्रूव्हमेंट करून द्वितीय श्रेणी मिळविल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल अहवालानुसार, या संस्थेचे अन्नपूर्णादेवी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, आरळ (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे आहे. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी नारायणराव भगत (रजनी मोहनराव मोरे) यांची नियुक्ती बारावीत शिक्षण घेत असतानाच झाल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ३० आॅगस्ट रोजी उघडकीस आणला. याच विद्यालयात रमेश संदीपान रणवीर यांची गणिताचे शिक्षक म्हणून २२ सप्टेंबर १९९९ रोजी नेमणूक केली. मात्र रणवीर एम. एस्सी.( संगणक) आहेत.
विशेष म्हणजे, २०१७ मध्ये रणवीर यांना मुख्याध्यापकांनी शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे वेतन बंद व संस्थेची फसवणूक केल्यासंबंधाचे पत्र देऊन ८ महिने पगार दिला नाही. नंतर मुख्याध्यापकांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र देऊन पुन्हा वेतन सुरू केल्याचा प्रकारही घडला आहे. दुसऱ्या एका नेमणुकीत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून एस. के. मोरे यांची १० जानेवारी २००० रोजी नियुक्ती केली. यावेळी मोरे एम. ए. (इंग्रजी) तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होते. कोणत्याही विषयासाठी नेमणूक करताना द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक असते. मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे इम्प्रूव्हमेंटसाठी अर्ज दाखल करून २००६ मध्ये परीक्षा दिली. या परीक्षेत ते द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मात्र नेमणुकीच्या वेळी त्यांच्याकडे पात्रता नसल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
शिक्षणाधिकारी, उपसंचालकांनी घातले पाठीशी
अन्नपूर्णादेवी उच्च माध्यमिक विद्यालयातील गैरप्रकाराच्या तक्रारी याच शाळेतील शिक्षकांनी हिंगोली माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आणि औरंगाबादचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अनेक वेळा केल्या आहेत. चौकशी अहवालात हिंगोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे चुकीची असताना कोणतीही ठोस कारवाई प्रस्तावित न करताच अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे सादर केला. शिक्षण उपसंचालकही यात कोणतीही कारवाई करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
सर्व नेमणुका नियमानुसारच
संस्थेने सर्व नेमणुका नियमानुसार केल्या आहेत. या नेमणुकांना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. या मान्यता त्यांनी डोळे झाकून दिलेल्या आहेत का? ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
- मोहनराव मोरे, अध्यक्ष, श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ, पूर्णा