पीककर्जासाठी मूल्यांकनात ‘प्रतीक्षे’ मुळे खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:04 AM2021-06-16T04:04:56+5:302021-06-16T04:04:56+5:30
औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत ...
औरंगाबाद: जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी मुद्रांक विभागाकडे जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करीत आहेत. परंतु मुद्रांक विभागातील ‘वेटींग’मुळे मूल्यांकन प्रत शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होतो आहे. रोज ३०० हून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज मुद्रांक विभागाकडे येत असून दिवसाआड ते अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.
अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत असले तरी मुद्रांक विभागावर अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे अर्जांचे ढीग लागत आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरु आहे, मान्सूनचे आगमनही झाले आहे. त्यामुळे शेतकरी विविध कारणास्तव वित्तीय संस्थांकडून पीककर्ज घेण्यासाठी अर्ज करीत असतात. अर्जासोबत जमिनीचे मूल्यांकन प्रत सोबत जोडावी लागते. त्यानंतर बँकेतून कर्ज मिळण्याची प्रक्रिया पुढे जाते.
जिल्ह्यात १३ मुद्रांक कार्यालये आहेत. दररोज २५ ते ३० शेतकऱ्यांचे अर्ज कार्यालयांत येत आहेत. सदरील अर्ज दिवसाआड निकाली काढण्यात येत असून ते एका दिवसांत द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्याची तक्रार अशी
गोलटगांव येथील शेतकरी वर्षा सोळुंके यांनी बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयात मिळालेल्या वागणुकीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले, मात्र त्याची पावती देखील दिली नाही. असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तेथील कर्मचाऱ्यांना रोज ७०० ते ८०० स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. तुमचे एकट्याचेच काम नाही, असे सांगून कर्मचारी दालनाबाहेर निघून गेले. अशी तक्रार त्यांनी केली आहे.
जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांची माहिती
जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले, मूल्यांकन करून देण्यासाठी १ दिवसाचा कालावधी लागतो. मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. तक्रारकर्त्यांची मूल्यांकन प्रत वेळेत दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यालयाची माहिती अशी
बीड बायपास येथील मुद्रांक कार्यालयाचे उपनिबंधक क्षीरसागर यांनी सांगितले, कर्मचारी कमी आहेत. तालुक्यासह प्रभाग क्षेत्राचा भार कार्यालयावर आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रत देण्यासाठी थोडाफार वेळ लागतो आहे.