अभिजात सौंदर्य लयास

By Admin | Published: July 5, 2017 12:29 AM2017-07-05T00:29:38+5:302017-07-05T00:33:37+5:30

औरंगाबाद : आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे.

Elite beauty lace | अभिजात सौंदर्य लयास

अभिजात सौंदर्य लयास

googlenewsNext

मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकबऱ्याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणाऱ्या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकबऱ्याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.
मकबऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे.
शहेनशहा औरंगजेबचा मुलगा आजमशहाने आई रबिया-उल-दुर्राणी ऊर्फ दिलरसबानो बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. समाधीची मुख्य इमारत १९ फूट उंच आणि ७२ फूट लांबीच्या चौरसाकृती विशाल ओट्यावर उभी आहे.
मकबऱ्याच्या अनन्यसाधारण सौंदर्यात भर घालण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. मकबऱ्याच्या निर्मितीसाठी लाल आणि काळे दगड, संगमरवर आणि स्टको प्लॅस्टर (गिलावा) वापरण्यात आले आहे. भिंतीवरील स्टको प्लॅस्टरवरील नक्षीकाम मकबऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.
मात्र, आता या गिलाव्याचे पापुदे्र वातावरणाचा मारा आणि भारतीय सर्वेक्षण खात्याच्या उदासीनतेने गळून पडत आहेत. संगमरवराचा शुभ्र परिणाम साधण्यासाठी वापरलेला गिलावा निघाल्यामुळे आतील दगड दिसत आहेत. पावसाचा मारा आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भिंती काळ्या पडत आहेत. पांढऱ्या मकबऱ्यावर जागोजागी काळे ठिपके पडल्याने त्याचे सौंदर्यच बाधित झाले आहे. समाधीच्या चारही कोपऱ्यांवर आकर्षक नक्षीकामाने नटलेल्या अष्टकोनी मिनाऱ्यांचेदेखील हेच हाल आहेत. मुघलकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून बीबी का मकबरा ओळखला जातो. देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्तुती आणि वर्णन ऐकून पर्यटक मोठ्या अपेक्षा ठेवून येथे येतात; पण येथील वाताहत पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो हे नक्की.
मकबऱ्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शायर बशर नवाज लिहितात,
‘मकबरा गुस्ल करे नूर की फुहारो में,
रक्स करती रहे नकहत (खुशबू),
इन्हीं गुलजारों में.’
आज खरंच अशी परिस्थिती आहे?

Web Title: Elite beauty lace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.