औरंगाबादला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६५ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:14 AM2019-06-03T02:14:51+5:302019-06-03T02:15:22+5:30
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाने गोंधळ
औरंगाबाद : गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाचे रविवारी सायंकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती, त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. विमानातील १६५ प्रवासी सुखरुप आहेत. रात्री साडेनऊपर्यंत प्रवासी विमानतळावरच ताटकळत होते.
पाटणाहून विमानाने उड्डाण केल्यानंतर अर्ध्या वाटेवर दोन्ही इंजिनची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. त्यातच विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. त्यामुळे वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला गो एअरच्या विमानाचे इमर्जन्सी लॅँडिंग होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्राधिक रणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. वैमानिकाने सुरक्षितपणे विमान धावपट्टीवर उतरविले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
दोन्ही इंजिनची गती मंदावली
विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती. लँडिंगसाठी आपत्कालीन परिस्थितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सुरक्षित लँडिंग झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.