डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्यावर भर
By Admin | Published: September 26, 2014 12:20 AM2014-09-26T00:20:18+5:302014-09-26T01:55:26+5:30
औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला
औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर रोजी चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात दोनशेहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. याप्रसंगी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्याबाबत डॉक्टरांना आवाहन करण्यात आले.
डेंग्यू होण्यापूर्वी रुग्णाच्या पोटात दुखणे, उलटी होणे, रक्तस्राव होणे, यकृतावर २ सेंटीमीटरपेक्षा अधिक सूज येणे, पेशी कमी होणे, एच.सी.टी. वाढणे, प्लेटलेट कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात. डॉ. दिलीप मुळे यांनी डेंग्यू विकारात रक्तचाचण्याचे महत्त्व आणि मर्यादा याविषयी मार्गदर्शन केले. डेंग्यू आजार गुंतागुंतीचा असूनसुद्धा रुग्ण कमी वेळेत सावरतात.
डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे म्हणाले की, अतिगंभीर रुग्णाला रक्तस्राव होत असल्यास ताजे रक्त व प्लेटलेटची गरज भासू शकते. तसेच ब्रुफेन, अॅस्पिरीन आणि स्टेरॉईड या औषधांचा वापर यावेळी टाळावा.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी डेंग्यूसारख्या साथरोगाचा अहवाल डॉक्टरांनी कसा सादर करावा, याबाबत माहिती दिली.
यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र लाठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ. सचिन फडणीस, डॉ. वर्षा आपटे, डॉ. तुंगीकर आदींची उपस्थिती होती. डॉ. अपर्णा राऊळ यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन
केले.