मराठवाड्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:22+5:302021-07-10T04:04:22+5:30

सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त, मराठवाडा कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा मोठा होता. रुग्णांच्या संख्येनुसार आरोग्य सुविधा ...

Emphasis on enabling health facilities in Marathwada | मराठवाड्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर

मराठवाड्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर

googlenewsNext

सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त, मराठवाडा

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा मोठा होता. रुग्णांच्या संख्येनुसार आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काम केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत विविध पातळीवर वैद्यकीय तज्ज्ञांकडून भाकिते केली जात आहेत. त्यातच म्यूकरमायकोसिस, डेल्टा, बालकोविडबाबत रोज नव्याने माहिती शासनाकडून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्ह्यांतील आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी केंद्रेकर आठवड्यातील प्रत्येक दिवशी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनलाईन आढावा घेऊन माहिती घेत आहेत. मराठवाडा आरोग्य सुविधेत सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग सर्वांसाठी नवीन होता. परंतु सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने फ्रंटवर्कर म्हणून योगदान दिले. दुसर्या लाटेत रुग्णसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, रेमडेसेविर इंजेक्शन पुरवठ्याचे पूर्ण विभागात नियोजन करण्यासाठी विभागीय पातळीवरच सर्व ताण येत राहिला. एप्रिल आणि मे महिन्यांत ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला. पुणे, रायगड येथून येणारे ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी अप्पर, उपायुक्त दर्जाचे अधिकारी ऑक्सिजन टँकर मराठवाड्यात आणण्यासाठी गेले. ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक व्हावा, रुग्णांना अनावश्यक ऑक्सिजन देणे टाळले जावे, यासाठी ऑडिट सुरू केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट खाटा औरंगाबादसह सर्व जिल्ह्यात वाढविल्या. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले.

कोरोना संसर्गाचा विषाणू स्वत: रूप बदलत असून, आता दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. यात लहान मुलांना हा विषाणू लक्ष्य करू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. बालकोविडचा सामना करण्यासाठी मराठवाड्यासमोर अनेक आव्हाने असून, मनुष्यबळ, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी पुरवठा याबाबत सर्व काही तयार राहील, या अनुषंगाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी बालरोग तज्ज्ञांना मे महिन्यांपासून सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या दोन लाटेत आरोग्य यंत्रणेने परिश्रमाने काम केले आहे, त्याप्रमाणे तिसऱ्या लाटेचा सामना हीच यंत्रणा करील आणि विभागाला सुरक्षित ठेवील, असा विश्वास केंद्रेकर यांना आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे विभागातील विकासकामांना खीळ बसू नये, महसूल कामे सुरळीत राहावीत, या दिशेने आयुक्त केंद्रेकर यांनी प्रयत्न केले. गेल्यावर्षी अतिवृष्टीचाही सामना विभागाला करावा लागला.

Web Title: Emphasis on enabling health facilities in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.