पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट
By बापू सोळुंके | Published: May 9, 2024 12:47 PM2024-05-09T12:47:18+5:302024-05-09T12:48:01+5:30
२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) पाच वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाणी बचतीला प्राधान्य देणाऱ्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९२ हजार ५८३ असल्याचे दिसून येते. यासाठी शेतकऱ्यांना तब्बल ६२२ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान शासनाने दिल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला. पोकरा योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. बहुतेक योजनेमध्ये ७५ ते ८० टक्के अनुदान शासनाने दिले होते. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी ‘पोकरा’तील योजनांचा लाभ घेतला. सतत पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वाधिक ७४ हजार ३५० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेतल्याचे दिसून येते. पाणी बचत करणाऱ्या या यंत्रणांचा लाभ घेणाऱ्या ठिबकच्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने ५५८ कोटी ९४ लाख ९८ हजार २७० रुपये तर तुषार सिंचन योजनेेचा तब्बल १८ हजार २३३ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. तुषार सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना ३३ कोटी ५६ लाख ९८० रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
८० टक्के अनुदानावर शेती उपयोगी यंत्रणा
पोकरामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सेट पुरविणे, गांडूळखत निर्मिती सेट देणे, पोल्ट्री उद्योगास साहाय्य, शेती यांत्रिकीकरण, वैयक्तिक शेततळे योजना, शून्य मशागत शेती प्रोत्साहन योजना, फळबाग योजना, मधुमक्षिकापालन, शेडनेट हाऊस, तुषार सिंचन सेट, फवारणी यंत्र, वैयक्तिक विहीर, शेततळे अस्तरीकरण योजना, पाइपलाइन, विहीर पुनर्भरण योजना, पॉलिहाऊस योजना, रेशीम शेती, मत्स्यपालन, मोटारपंप इ.चा यात समावेश होता.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले ९८७ कोटी ३३ लाख रुपये अनुदान
पोकराच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांना सुमारे ९८७ कोटी ३३ लाख ३ हजार ८१० रुपये अनुदान मागील पाच वर्षात प्राप्त झाले. यात सर्वाधिक लाभार्थी ठिबक सिंचनचे तर फळबाग लागवडीसाठी १५ हजार ८५५ शेतकऱ्यांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार ८७१ रुपयांचे अनुदान मिळाले.