इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा; विभागीय आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 01:41 PM2020-06-11T13:41:12+5:302020-06-11T13:44:46+5:30
विभागीय आयुक्तालयात चार तास चाललेल्या बैठकीत लॉकडाऊनमधील परिस्थिती, उपाययोजना, रुग्ण आणि मृत्यूदराबाबत आढावा घेण्यात आला.
औरंगाबाद : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्याचा पर्याय आहे. परंतु जवळचे कुणी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढून शहरात आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सौम्य किंवा लक्षण विरहीत असलेल्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन (संस्थात्मक उपचार) करण्यावर भर देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी दिले.
विभागीय आयुक्तालयात चार तास चाललेल्या बैठकीत लॉकडाऊनमधील परिस्थिती, उपाययोजना, रुग्ण आणि मृत्यूदराबाबत आढावा घेण्यात आला. रुग्ण उशीराने रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे उपचारास उशीर होत आहे. लागण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत रुग्ण दवाखान्यात दाखल झाला तर उपचार वेगाने करता येतात. उशीर झाला तर रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते, शिवाय तसेच इतर आजार असतील तर गुंतागुंत वाढते. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत, असे आयुक्तांना यंत्रणेने सांगितले.
इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनला प्राधान्य
सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत अशांना घरीच राहुन उपचार करता येण्याबाबत सुचना असल्या तरी त्यास रुग्णांपासूनच इतरांना आजाराची लागण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्या रुग्णांना कुटूंबातील इतर सदस्य, संपर्कात आलेल्या लक्षणे दिसून येत आहेत त्यांना घरी न ठेवता त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करावे लागणार आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी हे करावेच लागेल. गरज असेल तरच होम क्वारंटाइन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
होम क्वारंटाईनबाबत आयुक्त निर्णय घेतील
ज्या व्यक्तीच्या घरी रुग्णाची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते. त्यांना होम क्वारंटाईन करण्याबाबत डॉक्टर परवानगी देत होते. मात्र आता मनपा आयुक्त होम क्वारंटाईनची परवानी देतील. रुग्णाबाबत खात्री करुनच परवानगी द्यावी. असे आदेश केंद्रेकर यांनी दिले. महापालिका क्षेत्रामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी पालिकेने १ हजार पथके तयार केल्याची माहिती केंद्रेकर यांना मनपातर्फे देण्यात आली.