आहेत ते उद्योग टिकवण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:41+5:302021-07-11T04:05:41+5:30
कोरोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, हे सांगता येत नाही. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र बिघडले आहे. अलीकडे दुसऱ्या ...
कोरोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, हे सांगता येत नाही. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र बिघडले आहे. अलीकडे दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू होते. पण, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योगांची उत्पादने विकली गेली नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक उद्योगांना उत्पादन क्षमता कमी करावी लागली. यापुढेही या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे गृहीत धरून सध्यातरी आहेत ते उद्योग टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. उद्योगांचा विस्तार किंवा वाढीसाठी तर आमचे प्रयत्न आहेतच.
दुसरीकडे, औरंगाबादेत ‘डीएमआयसी’सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग आल्यास येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना उभारी येईल. ‘बजाज’सारख्या एकाच उद्योगावर येथे अनेक उद्योग कार्यरत आहेत. यापैकी काहींनी बाहेरच्या उद्योगांची व्हेंडरशिप घेतली; परंतु कोरोनामध्ये ऑर्डरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेक उद्योग डबघाईला आले. त्यामुळे येथे मोठे उद्योग आणण्यासाठी शासनाला मदत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
येथील उत्पादित मालाच्या निर्यातीला चालना देण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये आपल्या उद्योगांची जास्तीत जास्त ‘मार्केटिंग’ झाली पाहिजे. विविध देशांतील प्रदर्शनामध्ये उत्पादनांचे स्टॉल लावण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा उपयोग झाला पाहिजे. इंजिनिअरिंग उत्पादनासाठी दोन वर्षांपूर्वी ‘इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ (ईएपीसी) ही संस्था सुरू केलेली आहे. अशाप्रकारे अन्य उत्पादन क्षेत्रात मार्केटिंग करणाऱ्या अशासकीय संस्थांना पाठबळ देण्याचे काम ‘सीएमआयए’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मराठवाड्यात अंबा, मोसंबी, डाळिंब तसेच अन्य शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना देण्याचाही आमचा विचार आहे. ‘सीएमआयए’ने उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून दोन वर्षांपासून ‘स्टाईव्ह’ प्रकल्पांतर्गत खासगी ‘आयटीआय’मध्ये बेरोजगार तरुण- तरुणींना प्रशिक्षण दिले जाते व त्यांना रोजगार दिला जातो.
मराठवाडा व विदर्भ या मागास भागातील उद्योगांना चालना मिळावी, यासाठी शासनाने विजेची सबसिडी सुरू केली होती. अलीकडे ती काढून घेण्यात आली आहे. ती पूर्ववत चालू ठेवावी, यासंदर्भात ‘सीएमआयए’च्या वतीने आमचा पाठपुरावा करणार आहोत.
- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, सीएमआयए