सीए होताना प्रत्यक्ष अनुभवावर जोर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:10 AM2017-09-27T01:10:04+5:302017-09-27T01:10:04+5:30
चार्टर्ड अकाऊं टंट (सीए) म्हणून करिअर करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व देण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चार्टर्ड अकाऊं टंट (सीए) म्हणून करिअर करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व देण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी दिला. ‘लोकमत’ व सीए संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२६) लोकमत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर ‘आयसीएआय’च्या बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे, केंद्रीय समितीचे सदस्य सीए प्रफुल्ल छाजेड, सीए अनिल भंडारी, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सीए शैलेश चांदीवाल, डब्ल्यूआयआरसीचे सदस्य सीए उमेश शर्मा, सीए संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका, सीए रोहन अचलिया आणि सीए पंकज सोनी उपस्थित होते.
‘सीए म्हणून करिअर व सीए अभ्यासक्रमातील बदल’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भारतातील सीए कोर्स अद्ययावत अभ्यासक्रम, संवाद कौशल्य, माहिती व तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव (आर्टिकलशीप) या चार घटकांवर आधारलेला आहे. एक परिपूर्ण सीए होण्याकरिता गरजेच्या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.
उद्योगजगतातून नेहमी तक्रार केली जाते की, सीए विद्यार्थी तांत्रिक बाबतीत सक्षम असतात. मात्र, ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनाच्या बाबतीत कच खातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, सामान्य ज्ञान, संवाद कौशल्य आदी आवश्यक कौशल्य अवगत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी सीए शर्मा यांनी सीए व त्याच्याशी संबंधित करिअर संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) देशात अकाउंटंटची मागणी वाढली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सीए होऊ शकणार नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही’, असे ते म्हणाले. ओमप्रकाश केला म्हणाले, करिअरच्या दृष्टीने सीए हे उत्तम क्षेत्र आहे. सीए व्यक्ती कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो. सीए हर्षा तोतला यांनी सूत्रसंचालन केले.