कर्मचारी भरतीत गोंधळ
By Admin | Published: June 12, 2014 01:30 AM2014-06-12T01:30:40+5:302014-06-12T01:35:47+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (एनयूएचएम) च्या ३ वर्षांच्या उपक्रमाकरिता ११ महिन्यांच्या करारावर करण्यात येणाऱ्या कर्मचारी भरतीला आज गालबोट लागले.
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (एनयूएचएम) च्या ३ वर्षांच्या उपक्रमाकरिता ११ महिन्यांच्या करारावर करण्यात येणाऱ्या कर्मचारी भरतीला आज गालबोट लागले. एएनएम पदासाठी आलेल्या हजारांहून अधिक महिला उमेदवारांनी मनपा प्रशासनावर मेरिट लिस्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोप करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घुसून मुलाखत समितीला घेरले. त्याच संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आतील काचा फुटल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पालिका प्रशासनामध्ये या भरतीबाबत समन्वय नसल्यामुळे सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून ७६ जागांसाठी आलेल्या १ हजार ६६५ उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. मनपातर्फे होत असलेल्या कर्मचारी भरतीच्या मेरिट लिस्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून उमेदवारांनी मुलाखत समितीचे सदस्य उपायुक्त रवींद्र निकम यांच्या टेबलसमोरील सर्व मेरीट लिस्टचे गठ्ठे उधळून काही उमेदवारांचे अर्जही फाडले.
सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात याव्यात ही त्यांची मागणी होती. ती मागणी नियमबाह्य असल्याचे मनपाचे मत होते. तसेच समितीतील सदस्यांनी काही उमेदवारांना अपशब्द वापरल्यामुळे आणखी तणाव वाढला. सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, नगरसेवक अमित भुईगळ, विजेंद्र जाधव, उपायुक्त सुरेश पेडगावकर, अधिकारी शिवाजी झनझन आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
१० जूनपासून डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रात एनयूएचएमच्या उपक्रमासाठी गुणवत्तेच्या निकषावर ११ महिन्यांच्या करारावर कर्मचारी भरतीसाठी अर्ज घेण्यात आले. अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे ११ जून रोजी सकाळी ९ वा. मुलाखती घेण्याचे ठरले होते. स्टाफ नर्सच्या २८ जागांसाठी, १४ लॅब टेक्निशियनसाठी व १४ फार्मासिस्टच्या जागांसाठी आज अर्ज घेतले. पात्र उमेदवारांची यादी १३ जून रोजी मनपाच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.
एकूण किती जागा
नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत मनपाला २०१७ पर्यंत आरोग्य उपक्रमासाठी शासना अनुदान मंजूर झाले आहे.
शहरात नवीन ५ आरोग्य केंद्रांसाठी ११ महिन्यांच्या करारावर १५१ जागा भरण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १३२ जागा थेट मुलाखतीने भरल्या जाणार आहे. त्यामध्ये एनएचएमच्या ७६ जागा, फार्मासिस्ट १४, लॅब असिस्टंट १४, स्टाफ नर्स २८ जागांसाठी अनुक्रमे ९०, २४९, ६९ अर्ज आले आहेत. ७ हजार ५०० रुपयांचे वेतन त्यासाठी असेल. वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, लेखाधिकारी, डाटा एण्ट्री आॅफिसर ही पदे शासनाकडून भरली जाणार आहेत. त्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे.
अधिकाऱ्यांमध्येच जुंपली
भरती प्रक्रियेतील निवड समितीवरून अधिकाऱ्यांमध्येच जुंपली. मुलाखती समितीचे अध्यक्ष आयुक्त आहेत. तर उपायुक्त, आरोग्य उपसंचालक, नांदेड मनपा आरोग्य अधिकारी व मनपा आरोग्य अधिकारी सदस्य आहेत. मनपाचे पोलीस भरतीस्थळी आले नाहीत. डाटा आॅपरेटर दिले नाहीत. अर्ज छाननीसाठी कर्मचारी कमी पडले होते. यावरून उपायुक्त निकम, आरोग्य अधिकारी डॉ.कुलकर्णी यांच्यात वाद झाला.
पात्र उमेदवारांना सोमवारी बोलावणार
मुलाखतीसाठी सोमवारी पात्र उमेदवारांना बोलावण्यात येईल. उद्या १२ जून रोजी उमेदवारांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) प्रकाशित करण्यात येईल. १ जागेसाठी ५ उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येणार होते. मात्र, उमेदवारांच्या मागणीनुसार १ जागेसाठी १५ जणांना बोलावू, असे उपायुक्त रवींद्र निकम यांनी जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी संशोधन केंद्र सोडले. उमेदवार नाव, टक्केवारीसह यादी लागेल. ज्यांना काही आक्षेप असेल त्यांना प्रशासनाकडे अर्जही करता येईल.
कशामुळे झाला गदारोळ
११ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून मुलाखती झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास तातडीने नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी काल १० रोजी सांगितले होते. मात्र ३८० उमेदवारांची यादी प्रशासनाने आज लावल्याने उमेदवारांनी धिंगाणा केला. ८० टक्क्यांहून अधिक गुण असलेले २५८ उमेदवार होते. मनपाने दिलेल्या जाहिरातीमध्ये १ जागेसाठी ५ जण बोलाविण्यात येणार होते.
२ वर्षे अनुभव, शासन कोर्सला प्राधान्य आणि शालांत, माध्यमिक, पदवी परीक्षेच्या गुणवत्तेवर उमेदवाराची निवड केली होती.
५ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या; मात्र सर्वांच्या मुलाखती घेण्याची मागणी सुरू झाली आणि गदारोळ झाला.