निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:18 PM2024-04-12T19:18:31+5:302024-04-12T19:19:30+5:30
जालना लोकसभा निवडणूकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यालय आहे.
फुलंब्री : जालना लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने आज मृत्यू झाला. संजय सांडू ऋषी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात कर्तव्यावर असताना आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने ऋषी कोसळले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जालना लोकसभा निवडणूकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यालय आहे. येथे फुलंब्री येथील भूमिअभिलेख विभागात कार्यरत संजय सांडू ऋषी ( ५२ ) यांची एक महिन्यापूर्वी शिपाई म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान नियमित काम करीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ऋषी जमिनीवर कोसळले.
इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलीच उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरु असताना ऋषी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. माहिती मिळताच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच भूमिअभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.