कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना
By विजय सरवदे | Published: February 6, 2024 07:54 PM2024-02-06T19:54:36+5:302024-02-06T19:55:12+5:30
कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना !
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील ‘लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या मुख्यालयातील सर्वच विभागांत हजेरीसाठी ‘ग्रामीण ॲप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतात; पण अनेकदा ते टेबलावर दिसतच नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडे ताटकळत बसण्याशिवाय तरणोपाय नसतो.
अलीकडे, सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्या मिळत आहेत. कार्यालयीन कामांचा निपटारा करण्यासाठी अगोदर ५:३० वाजता सुटणारे कार्यालय आता सायंकाळी ६:२० पर्यंत चालते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालतो का, जि.प. समाज कल्याण विभागात याचे निरीक्षण सोमवारी सकाळी ९:५० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत करण्यात आले. तेव्हा अधिकारी- कर्मचारी १० वाजेच्या आत कार्यालयात पोहोच झाले. प्रत्येक जण आपापल्या टेबलवर जाऊन नियमित कामकाज करताना दिसून आले; पण तासाभरातच काही जण मोबाइलवर बोलत बाहेर रेंगाळताना दिसून आले, तर काही जण चहापानासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात चार- पाच सामाजिक कार्यकर्ते दलित सुधार योजनेबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र, योजनेचा आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच पडली. अन्य दोघे जण उपकरातील योजनांच्या यादीतील नावांबाबत खातरजमा करण्यासाठी आले होते.
वेळ ९:४५ ची, १०:१० पर्यंत येणे सुरूच
पाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजेची आहे. मात्र, अनेक जण धावतपळत १०:१० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचताना दिसून आले.
चार-चार चकरा मारूनही काम होईना
सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आम्हाला आला. अनु. जाती व नवबौद्ध वस्ती विकासाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नेमके घोडे कुठे आडले, हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, यासंबंधीचा आराखडाच अजून अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
- दामूअण्णा कांबळे
कर्मचारी कामावर नाही, असे होत नाही
‘ग्रामीण ॲप’मुळे सर्वांनाच आता वेळेत यावे लागते. जो उशिरा येईल, त्याची आपोआप अर्ध्या दिवसाची हजेरी लागते. कोणी टेबलवर दिसत नाही, याचा अर्थ कर्मचारी कामावर नाही, असा होत नाही. वरिष्ठांना कामांची माहिती देण्यासाठी कर्मचारी मोबाइलवर बोलतात. अनेकदा कार्यालयात मोबाइलची रेंज येत नाही, यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर यावे लागते.
- डॉ. ओपप्रकाश रामावत, प्रभारी समाजकल्याण अधिकारी.