कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन
By Admin | Published: July 16, 2016 12:58 AM2016-07-16T00:58:57+5:302016-07-16T01:12:00+5:30
उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.
उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये जिल्हा तसेच तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे.
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यकांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकी व विनंती बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यात यावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जॉबचार्ट, कर्तव्यसूची निश्चित करावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्याप्रमाणेच लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सर्वस्तरीय नि:शुल्क सवलत मिळावी, वाहनचालकांप्रमाणे अतिरिक्त भत्ता मिळावा, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मूळवेतन मिळण्यासाठी २२ एप्रिल २००९ रोजीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, जिल्हा निवड समितीद्वारे किंवा ‘एमपीएससी’द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी लिपिकांना ४५ वर्ष वयोमर्यादेपर्यंत परीक्षेला बसण्याची सवलत मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कार्यालय सुरू झाल्यापासूनच कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले.
दुपारी १ वाजेपर्यंत कर्मचारी कुठलेही काम न करता कर्मचारी आपपाल्या जागेवर बसून होते. दुपारनंतर तर बहुतांश कार्यालयामध्ये रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन झाले. जोपर्यंत शासन न्याय मागण्यांचा विचार करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा संघटनेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष भास्कर कोल्हे, उपाध्यक्ष राहुल माने, सचिव ऋषिकेश पिंगळे यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)