सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:47 AM2024-07-24T11:47:35+5:302024-07-24T11:49:21+5:30
आयकराच्या मर्यादेत वाढ न झाल्याने नोकरदार नाराज, तर लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा
छत्रपती संभाजीनगर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयकराच्या मर्यादेत पाच लाखांपर्यंतची वाढ न झाल्याने छत्रपती संभाजीनगरातील नोकरदारांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे सोन्यावरील सीमा शुल्क कमी केल्याने सोन्याचे दर कमी झाल्याने महिलावर्ग खुश आहे. याबरोबरच हा अर्थसंकल्प लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा देणारा असल्याने त्याचा महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी लाभ होईल, याची येथील उद्योजकांना आशा आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर शहरातील अनेक जाणकार नागरिक, व्यापारी व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, तसेच अर्थशास्त्राचे अभ्यासक- विद्यार्थी, सीए आदींसह काही कुटुंबांमध्येही वृत्तवाहिन्यांवर अर्थसंकल्प पाहण्यात आला. आपापल्या क्षेत्रावर त्याचा काय परिणाम झाला, अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्ती किती झाली, यासंबंधी जाणकारांनी मते व्यक्त केली.
नोकरदार वर्गच खऱ्या अर्थाने उत्पन्न कर भरतात. त्यामुळे केंद्र शासनाने अर्थसंकल्पात या वर्गासाठी सवलत देण्याऐवजी दरवर्षी त्यात काहीना काही वाढ करण्याचा निर्णय योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नोकरी करणारे व कर भरणारे स्वप्नील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त व्हायला हवे होते. स्लॅबनिहाय उत्पन्न आणि कर भरणा करताना करदात्यांची तारांबळ होते. गुंतवणुकीचे पर्याय जरी असले तरी त्याचे परतावे काही प्रमाणातच मिळतात. नियमित कर भरणाऱ्यांना इन्सेन्टिव्ह देण्याचा विचारही शासनाने केला पाहिजे, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.
देशात १०० ठिकाणी औद्योगिक पार्क उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली. उद्योगांना अत्यंत कमी दराने कर्ज देणाऱ्या सिडबी बँकेच्या २४ शाखा उघडण्याचा निर्णय चांगला आहे, याचा लाभ छत्रपती संभाजीनगरला मिळाला पाहिजे, अशी उद्योजकांना अपेक्षा आहे. महिला उद्योजकांना स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट दिल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षाही आहे. शहरातील तरुणांना मात्र या अर्थसंकल्पातून त्यांच्या हाती काही लागेल, याबद्दल शंका आहे, तर दुसरीकडे जिल्हाभरातील २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.
महिलांकडून नाराजी
इंधन, तसेच गॅसच्या किमती याबाबत अर्थमंत्र्यांनी काहीच दिलासा न दिल्याने नाराजी व्यक्त केली. महागाईबाबतही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कोणताच दिलासा दिला नाही, याबद्दल मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्री यादव यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली.