कर्मचाऱ्यांची दिवाळी, ठेवीदारांना ठेंगा

By Admin | Published: October 29, 2015 12:15 AM2015-10-29T00:15:00+5:302015-10-29T00:24:24+5:30

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विश्वास ठेवत अनेक ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. आता बँकेची परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले जात आहे.

Employees will get Diwali, Deposits to the Diwali | कर्मचाऱ्यांची दिवाळी, ठेवीदारांना ठेंगा

कर्मचाऱ्यांची दिवाळी, ठेवीदारांना ठेंगा

googlenewsNext


बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विश्वास ठेवत अनेक ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. आता बँकेची परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, भत्ते व दिवाळी अ‍ॅडव्हान्स मागितला असून, या सर्व मागण्या मंजूर करण्याच्या हालचाली अध्यक्ष आदित्य सारडा यांच्याकडून केल्या जात आहेत. ठेवीदारांना ठेंगा दाखवतानाच कर्मचाऱ्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती चांगली असताना बँकेमार्फत कोट्यवधीचे व्यवहार होत होते. ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जात होती. मात्र, मध्यंतरी अनेकांना कर्जवाटप झाले होते. कर्जवाटप करताना नियमांचे उल्लंघन झाले होते. यामुळे बँकेवर घोटाळ्याचा ठपका बसला व आर्थिक व्यवहार बंद झाले. त्यानंतर बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. ज्या लोकांनी बनावट दस्तऐवज दाखवून कर्ज घेतले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. चार वर्षांच्या कालावधीत बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी देणे अवघड झाले होते.
जवळपास सहा महिन्यांपूर्वी नवीन संचालक मंडळाने बँकेचा व्यवहार हातामध्ये घेतला. त्यानंतर काही प्रमाणात ठेवी वाटपाला सुरूवात झाली. सद्य परिस्थितीत ठेवीदरांचे जवळपास ६७१ कोटी रूपये देणे बाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वसामान्यांचे पैसे अडकले आहेत. ठेवी मिळाव्यात यासाठी सर्वसामान्य बँकेचे खेटे मारतात. परंतु त्यांना पैसे मिळत नाहीत.
चार महिन्यांपूर्वी ठेवीदारांना गरजेप्रमाणे त्यांच्या ठेवी दिल्या जायच्या. त्यानंतर प्रत्येकी पाच हजार रूपये देण्यात येत होते. गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी अध्यक्ष आदित्य सारडा यांनी जिल्ह्यातील ५९ शाखांमध्ये खातेदारांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रूपये जमा केले होते. आतापर्यंत २९ हजार ६५२ लोकांनी बँकेतून पैसे काढले आहेत. लहान ठेवीदारांचे पैसे मिळाले असले तरी मोठे ठेवीदार अद्याप बाकी आहेत. वसुलीची परिस्थिती म्हणावी तशी नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल झालेली आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करू नये असे आदेश शासनाने काढलेले आहेत. यामुळे वसुली मंद गतीने सुरू आहे. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली म्हणावी तशी नाही. दुसऱ्या बाजूला तीन ते चार वर्षांपासून ठेवीदार पैसे मिळतील या आशेवर आहेत.
अशी बिकट परिस्थिती असतानाही अध्यक्ष आदित्य सारडा हे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व दिवाळी अ‍ॅडव्हान्स देण्याच्या प्रयत्नात आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत हक्काचे पैसे असतानाही ठेवीदारांना वारंवार चकरा माराव्या लागतात. चकरा मारूनही पैसे मिळतील याची शाश्वती नसते. डीसीसी बँकेतून पैसे न मिळाल्याने अनेकांना मुलींची लग्ने लावता आली नाहीत. उपचारासाठी पैसे लागत असतानाही ते मिळू शकले नाहीत. पैसे मिळाले तरी केवळ पाच हजार रूपये मिळायचे. उर्वरित रक्कम टप्प्याने दिली जाईल असे आजही सांगण्यात येते.
अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, भत्ता व दिवाळी अ‍ॅडव्हान्स देणे कितपत योग्य आहे याचा विचार संचालक मंडळाने करण्याची वेळ आली असल्याची भावना ठेवीदारांमधून व्यक्त होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५९ शाखांमधून ३५२ कर्मचारी काम करतात. त्यांच्या वेतनावर महिन्याकाठी जवळपास १ कोटी रूपये खर्च केले जातात.
४पगारवाढ १० ते २० टक्के अपेक्षित धरली असता ३५२ कर्मचाऱ्यांचे १० लाख रूपये धरतील व वर्षाकाठी १ कोटी २० रूपये होतील.
४क्लिअरिंग हाऊस बंद आहे. वसुली मंद गतीने सुरू आहे. अशा परिस्थितीत दिवाळी अ‍ॅडव्हान्स, वेतनवाढ व भत्ते दिल्यास जवळपास २५ ते ३० लाख रूपये कर्मचाऱ्यांवर खर्च करावा लागेल.
४कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर, दिवाळी अ‍ॅडव्हान्सवर आक्षेप नाही. मात्र, बँक अद्याप पूर्ववत झालेली नाही. ठेवीदारांचे पैसे बाकी आहेत. त्यामुळे अध्यक्ष सारडा यांनी ठेवीदारांचा विचार करायचा की कर्मचाऱ्यांचा हा निर्णय त्यांनी घेणे आवश्यक आहे.
४डीसीसीमधील सूत्रांच्या माहितीनुसार, बँकेवर प्रशासक असताना कर्मचाऱ्यांचे वेतन चार ते पाच पटीने वाढविले होते. त्यावेळी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असतानाही हा निर्णय घेण्यात आला होता. पुन्हा वेतनवाढीचा घाट कशासाठी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Employees will get Diwali, Deposits to the Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.