६ हजार उद्योगांचा ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:47 AM2017-08-01T00:47:07+5:302017-08-01T00:47:07+5:30
औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत ५२ वर्षांमध्ये स्थापन केलेल्या विविध औद्योगिक वसाहतींतील ६ हजार २०० उद्योगांमुळे भविष्यातील ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’ म्हणून या तीन जिल्ह्यांकडे पाहिले जाणार आहे.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची मराठवाड्यात स्थापना होण्याला उद्या १ आॅगस्ट रोजी ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत ५२ वर्षांमध्ये स्थापन केलेल्या विविध औद्योगिक वसाहतींतील ६ हजार २०० उद्योगांमुळे भविष्यातील ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’ म्हणून या तीन जिल्ह्यांकडे पाहिले जाणार आहे.
औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही जिल्हे पूर्णत: मुंबई-ठाण्याप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. कालांतराने समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीच्या पूर्ण रूपानंतर बीडदेखील याच रेट्याखाली येईल. आॅटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक, स्टील, मद्य, सीडस्, फार्मा, फूड प्रोसेस क्षेत्रातील उद्योग या ट्रँगलमध्ये आहेत. मराठवाड्यात एमआयडीसीची आठ जिल्ह्यांसाठी औरंगाबाद, लातूर आणि नांदेड अशी तीन कार्यालये आहेत. पूर्वी विभागीय कार्यालय औरंगाबादच होते; परंतु माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी परभणी, हिंगोलीसह नांदेड येथे, तर माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी उस्मानाबाद व लातूर येथे प्रादेशिक कार्यालय सुरू केले. १९६२ साली राज्यात एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर १९६५ ला औरंगाबादमध्ये चिकलठाणा, पैठण १९७६, नंतर १९८४ मध्ये वाळूज या औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली, तसेच १९९४ मध्ये खुलताबाद, १९९७ मध्ये वैजापूर, १९९८ मध्ये शेंद्रा, २०१० मध्ये शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक वसाहतींचा धोरणानुसार उदय झाला.
सध्या जालन्यातील ८ औद्योगिक वसाहतींमध्ये ८६८ उद्योग, बीड जिल्ह्यातील ५ औद्योगिक वसाहतींमध्ये ३४७ उद्योग, तर औरंगाबादमधील ८ औद्योगिक वसाहतींमध्ये ४ हजार ९८५ उद्योग आहेत.
औरंगाबादमधील शेंद्रा-डीएमआयसी, बिडकीनमधील प्लॉटवर अजून बड्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवलेली नाही. त्यामुळे तेथील प्लॉटस् अजून उद्योगांसाठी देण्याचे धोरण पूर्णरूपाने समोर आलेले नाही. १० हजार एकर जागा औरंगाबाद डीएमआयसी नोडमध्ये उद्योगांसाठी उपलब्ध होईल.