खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांचा खिसा रिकामा, मनमानी भाडे वसुली रोखणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 02:12 PM2021-11-10T14:12:46+5:302021-11-10T14:14:14+5:30
मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे.
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात यावे, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामा करीत आहेत.
मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात अर्धनग्न आंदोलन केले. तसेच जागरण- गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहित आंदोलनात सहभागी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित कायद्याप्रमाणे वेतन देऊ नये, अशी मागणी केली. सिडको बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी मुंडण करीत जागरण-गोंधळ घातला. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांकडून अवाचे सवा पैसे आकारण्यात येत होते. प्रवासी नेण्यावरून खासगी वाहतूकदारांमध्ये वादही होत होते; परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणीही नव्हते.
खासगी वाहतूकदारांना एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध
बसस्थानकात खासगी वाहने आणून प्रवासी वाहतूक करण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याबरोबर त्यांच्याकडून एसटीपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सर्व प्रकारच्या खासगी बस, स्कूलबस, कंपनीच्या बसेस, मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसेसची वाट न पाहता तसेच बसस्थानकावर गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणाहून या वाहनांतून प्रवास करावा आणि आपली गैरसोय टाळावी. प्रवासादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे.