घाटीची झोळी रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:00 AM2017-08-21T01:00:56+5:302017-08-21T01:00:56+5:30
घाटी रुग्णालयातील अनेक प्रस्ताव आणि कामे निधीअभावी महिनोन्महिने रखडली आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अनेक प्रस्ताव आणि कामे निधीअभावी महिनोन्महिने रखडली आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घाटी प्रशासनाने लोकप्रतिनिधींची दारे ठोठावली. परंतु लोकप्रतिनिधींकडूनही आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नाही. त्यामुळे घाटीची झोळी रिकामीच राहत आहे.
नव्याने बांधण्यात आलेले मध्यवर्ती ग्रंथालय आणि वसतिगृह फर्निचरअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. वापराशिवाय या इमारती जुन्या होत आहेत. ग्रंथालय आणि वसतिगृहासाठी आवश्यक फर्निचर, खुर्च्या, कपाट, टेबल, पंखे आदी साहित्य खरेदीसाठी शासनाला २ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही.
दुसरीकडे घाटीला औषधी व साहित्याचा पुरवठा करणाºया विविध कंपन्यांचे पैसे थकल्यामुळे दरपत्रकावरील कंपन्यांनी पुरवठा थांबविला जातो. त्यातून वेळोवेळी औषधी पुरवठा विस्कळीत होतो. औषधांच्या तुटवड्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औषधांची तब्बल दहा कोटींची बिले प्रलंबित आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तात्काळ मिळणे आवश्यक आहे. परिणामी वेळोवेळी औषधी तुटवड्याला सामोरे जावे लागते.
दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण, कर्मचाºयांची अपुरी संख्या आणि अपुºया सोयी-सुविधांमुळे घाटी रु ग्णालयाच्या रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. २०१३ पासून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याने निधी असूनही कामे खोळंबली आहेत. अशा विविध समस्यांसह २३२ कोटींच्या कामांचा १२ आॅगस्टला खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. तसेच १५ आॅगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) निधी देण्यात यावा, अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे घाटी प्रशासनाने पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली. आता ग्रंथालय आणि वसतिगृहाच्या फर्निचरच्या निधीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री, वित्तमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, असे अभ्यागत समितीच्या बैठकीप्रसंगी आ. अतुल सावे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.