सुपारी किलर इम्रानला पळविण्यासाठी मध्यप्रदेशातून आले होते शार्प शुटर; औरंगाबाद पोलिसांनी धाडसाने उधळला कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:42 AM2018-08-28T00:42:50+5:302018-08-28T00:43:48+5:30

सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना किंवा अगदी न्यायालयाच्या परिसरातून गोळीबार करून पळवून नेण्याचा कट सोमवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला.

Emraan cut off! | सुपारी किलर इम्रानला पळविण्यासाठी मध्यप्रदेशातून आले होते शार्प शुटर; औरंगाबाद पोलिसांनी धाडसाने उधळला कट

सुपारी किलर इम्रानला पळविण्यासाठी मध्यप्रदेशातून आले होते शार्प शुटर; औरंगाबाद पोलिसांनी धाडसाने उधळला कट

ठळक मुद्देन्यायालय परिसरात गोळीबाराची होती योजनाशार्पशूटरसह नऊ अटकेत; सात जण मध्यप्रदेशातील

औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना किंवा अगदी न्यायालयाच्या परिसरातून गोळीबार करून पळवून नेण्याचा कट सोमवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा, असा हा थरार गरवारे क्रीडा संकुल ते नारेगाव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला आणि चार शार्प शूटरसह नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. आरोपींकडून पिस्टल, आठ काडतुसे आणि एक वापरलेले काडतूस तसेच कारसह तीन वाहने जप्त करण्यात आली. यापैकी सात जण मध्यप्रदेशातून आले होते.

सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे नारेगावकडे जाणारी वाहतूक सुरू होती. अचानक चार पोलीस कर्मचाºयांनी दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली. त्याच वेळी गर्दीतून पुढे निघालेल्या दुचाकीवरील दोघांवर साध्या वेशातील पोलिसांनी झडप घातली. दुचाकीवरील एकाने प्रतिकार करून कमरेचे पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मानगुटीला आवळून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. त्याच वेळी मागून आलेल्या एका कारच्या मागेपुढे अचानक पोलिसांची वाहने उभी राहिली. पोलीस आपल्या वाहनांमधून पटापट बाहेर आले आणि कारला चोहोबाजूंनी घेरले. कारमध्ये बसलेल्या सर्वांवर पोलिसांंनी पिस्तूल रोखले. पोलिसांच्या या गनिमी काव्याने कारमधील गुन्हेगार स्तब्धच झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रक रणी कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीसह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याचे आरोपींना माहिती होते. पोलिसांनी भक्कम साक्षीपुरावे उभे केल्याने या प्रकरणात न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाणार असल्याचे आरोपींना कळाले होते. इम्रान आणि त्याच्या साथीदारांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यावेळी पोलिसांवर गोळीबार करून त्याची सुटका करण्याचा कट रचण्यात आला होता.

या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यप्रदेशातील सात शार्प शूटर ७.६५ मिमी बोअरचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन शहरात दाखल झाल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी, कर्मचा-यांनी पहाटे पाच वाजेपासून आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दिल्लीगेट येथे मध्यप्रदेशमधील नंबर प्लेट असलेली कार दिसली. ही कार काही वेळाने कटकटगेट परिसरात गेली. त्या कारवर नजर ठेवून असलेल्या पोलिसांना चकमा देऊन कार थेट नारेगाव येथे गेली. तेथील एका घराच्या भिंतीलगत कार उभी केली. त्यानंतर एक जण देशी दारूच्या दुकानातून दारू घेऊन जाताना दिसला.

जीव धोक्यात घालून केली झटापट...
सशस्त्र असलेले आरोपी जेथे थांबलेले आहेत त्या घरावर धाड मारणे धोक्याचे ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी नारेगाव चौकाजवळील निमुळत्या रस्त्यावर त्यांना पकडण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार गरवारे क्रीडा संकुल ते नारेगाव चौकादरम्यान दोन पोलिसांना उभे करून वाहतूक थांबविण्याचे सांगण्यात आले. अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी एक कार आणि दोन मोटारसायकलीने गरवारे क्रीडा संकुलाच्या दिशेने निघाल्याचे दिसताच पोलीस निरीक्षक सावंत यांनी समोर थांबलेल्या पोलिसांना वाहतूक थांबविण्यास सांगितले. यामुळे दोन्ही बाजूने अचानक वाहतूक कोंडी झाली. यावेळी संशयित दोन दुचाकीस्वार गर्दीतून मार्ग काढून पुढे आले. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या पोलिसांनी झडप घातली. त्यावेळी एक जण पोलिसांच्या हाती लागला. दुसरा पळू लागताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली, त्यावेळी त्याने कमरेचे पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलिसांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि दुस-याने त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले.

चार अधिका-यांनी पिस्तूल रोखताच कारमधील सर्व शरण
कारमध्ये बसलेल्या आरोपींकडेही शस्त्रे असू शकतात, त्यामुळे सर्व आरोपींना पकडताना पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली. आरोपींना संशय येऊ नये, यासाठी साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या दोन कार आणि दोन मोटारसायकलीवरून त्यांच्या मागावर होते. वाहतूक थांबविली त्यावेळी आरोपींच्या पुढे आणि मागे पोलिसांचे वाहन होते, तर डाव्या बाजूला एक प्रवासी रिक्षा उभी होती. आरोपींना पकडण्याची हीच वेळ असल्याचे अधिका-यांनी एकमेकांना इशारा करून ठरविले आणि सर्वांनी कमरेचे पिस्तूल काढून कारमध्ये बसलेल्या आरोपींवर रोखले. एकाच वेळी चार अधिका-यांनी पिस्तूल रोखल्याचे पाहून कारमधील सर्व आरोपींनी हात वर केले आणि अन्य पोलिसांनी एक-एकाला कारमधून उतरवून त्यांची झडती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.

अंधा तीर छोडेंगे....
गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी याविषयी सांगितले की, अटकेतील आरोपींपैकी सात जण मध्यप्रदेशातील शार्प शूटर आहेत. ते तेथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यातील एक जण तर अंधा तीर छोडेनेवाला असा आहे. म्हणजे तो डोळे बांधून अचूक पद्धतीने निशाणा साधू शकतो. आरोपी दोन ते चार हजारात एखाद्याचा खून करणारे आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे, एक वापरलेल्या काडतुसाची नळी मिळाली.

अटकेतील आरोपींची नावे
नफीस खान मकसूद खान(४०, रा. मध्यप्रदेश), नकीब खान रयाज मोहम्मद (५५), फरीद खान मन्सूर खान (३५), सरूफ खान मन्सूर खान (४५), शब्बीर खान समद खान (३२), फैजुल्ला गणी खान (३७ ), शाकीर खान कुर्बान खान (४०, सर्व रा. मध्यप्रदेश), शेख यासेर शेख कादर (२३), सय्यद फै सल सय्यद एजाज (१८, सर्व औरंगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात हबीब खालेद हबीब मोहम्मद ऊर्फ खालेद चाऊस, मोहम्मद शोएब (दोघे रा. औरंगाबाद) यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

हर्सूल परिसरात केला गोळीबाराचा सराव
मेहदी गँगला २४ आॅगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, नंतर ही तारीख २७ आॅगस्ट झाली. सूत्रांनी सांगितले की, आरोपी हे २३ आॅगस्ट रोजीच शहरात आले होते. त्यांनी आणलेल्या शस्त्रातून हर्सूल परिसरात निर्जन स्थळी त्यांनी गोळीबाराचा सरावही केला. त्यातील एक रिकामी पुंगळी पोलिसांच्या हाती लागली.

कॅप्टन मास्टर माइंड कोण?
एक वर्षापूर्वी जामिनावर सुटलेल्या हबीब खालेद चाऊस आणि मोहम्मद शोएब यांनी कॅप्टनच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हा कॅप्टन कोण आहे. इम्रान मेहदीला ते कॅप्टन म्हणत असावे अथवा अन्य कोणी आरोपी या कटाचा मास्टर माइंड आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, अमोल देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारी, सुभाष शेवाळे, नितीन जाधव, मनोज चव्हाण, अशरफ सय्यद, संतोष सूर्यवंशी, हकीम पटेल, सिद्धार्थ थोरात, शिवाजी झिने, जाधव, नवाब शेख, नितीन धुळे, दत्ता गडेकर, वीरेश बने, ओमप्रकाश बनकर, धर्मा यांनी प्राण धोक्यात घालून ही कारवाई केली.

Web Title: Emraan cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.