उद्घाटनापुरतेच उघडले हमीभाव खरेदी केंद्र !
By Admin | Published: May 15, 2017 11:50 PM2017-05-15T23:50:00+5:302017-05-15T23:50:51+5:30
लातूर : तूर खरेदी केंद्राचे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले.
हरी मोकाशे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारपेठेत दर कोसळला. शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा म्हणून शासनाच्या आदेशानुसार शहरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्राचे नियोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास केंद्राचे उत्साहात उद्घाटनही करण्यात आले. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा जास्त आवक होऊ लागल्याने दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले.
दरम्यान, या केंद्राची मुदत संपुष्टात आल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली. तरीही आवक होत असल्याचे पाहून पुन्हा तूर खरेदीस मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरातील बाजार समितीतील गुळ मार्केट परिसरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोमवारपासून तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी लातुरातील हमीभाव खरेदी केंद्रावर वाहनाद्वारे तूर आणण्यास सुरुवात केली.
सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती परिसरात लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती मनोज पाटील, लालासाहेब देशमुख, ‘आत्मा’चे पाटील, बाजार समिती सचिव मधुकर गुंजकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
उद्घाटन झाल्यानंतर तुरीचा मापतोल सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपताच उद्घाटकांसोबत आलेले पाहुणे व केंद्राचे अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे रात्रीपासून ताटकळत थांबलेल्या जवळपास शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे आता जायचे कुणाकडे? असा सवाल तूर उत्पादकांसमोर निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी तर आपले वाहन बाजार समितीतील आडत्यांकडेच वळविल्याचे पहावयास मिळाले.