बजाजनगरातील मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:01+5:302021-01-03T04:06:01+5:30

अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली वाळूज महानगर : बजाजनगरातील मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या ...

Encroach on the main square of Bajajnagar | बजाजनगरातील मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा

बजाजनगरातील मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा

googlenewsNext

अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली

वाळूज महानगर : बजाजनगरातील मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे सतत वाहुतकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. या वसाहतीतील मोहटादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रमेश मोरे चौक, जयभवानी चौक आदी प्रमुख चौकांत विक्रेत्यांनी अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले आहेत. याशिवाय मोठ्या व्यावसायिक दुकानदारांनी एमआयडीसीच्या जागेवर आपला हक्क दाखवित पोटभाडेकरू ठेवले आहेत. मुख्य चौकात हॉटेल, हातगाड्या व भाजीपाल्याच्या दुकानावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बहुतांश व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागाच न ठेवता पार्किंगच्या जागा बळकावल्या आहेत. या अतिक्रमणामुळे मुख्य चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य चौकात झालेल्या या अतिक्रमणामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताचे प्रमाणही वाढतच चालले आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली

एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी बजाजनगरसह औद्योगिक क्षेत्रात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यामुळे मुख्य चौकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, अतिक्रमण हटाव मोहीम बारगळल्यामुळे उद्योगनगरीसह बजाजनगरातील मुख्य चौकात पुन्हा अतिक्रमणे जैसे थे झाली आहेत. या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एमआयडीसी प्रशासनही अतिक्रमणाकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

फोटो ओळ- बजाजनगरातील मोहटादेवी चौकाला असा अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. दुसऱ्या छायाचित्रात पंढरपुरातून औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षा चालकांनी कब्जा केला आहे.

फोटो क्रमांक- अतिक्रमण १/२

----------------------------

Web Title: Encroach on the main square of Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.