अतिक्रमण, अग्निशमनचे ‘माणिक’ला अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:57 AM2018-04-04T00:57:10+5:302018-04-04T15:19:17+5:30
गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे. घटनेतील दोषींचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळींची समितीही नेमण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. आग प्रकरणात महापालिकेचे अतिक्रमण हटाव आणि अग्निशमन विभाग शंभर टक्के दोषी असल्याचे दिसून येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना अभय देण्यात येत आहे.
औैरंगपु-यातील फटाका मार्केटला आग लागून १०० पेक्षा अधिक दुकाने खाक झाली. जुन्या शहरातील पेट्रोलपंपांना अनेकदा आग लागली. मोठ्या इमारतींना अधून मधून आग लागल्याच्या घटना घडतच असतात. त्यानंतरही महापालिकेने आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
नागरिकांची सुरक्षा हे महापालिकेचे दायित्व आहे, याचाही विसर प्रशासनाला पडला आहे. सोमवारी सकाळी माणिक हॉस्पिटलला आग लागली. वेळीच सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. माणिक हॉस्पिटलने काही वर्षांपूर्वी रुग्णालय उभारणीसाठी मनपाकडून रीतसर परवानगी घेतली. बांधकाम परवानगीनुसारच काम करण्यात आले. भोगवटा प्रमाणपत्रही मिळविले. त्यानंतर इमारतीची पार्किंग गायब करण्यात आली. इमारतीमध्ये अनेक अंतर्गत फेरबदल नियमबाह्य करण्यात आले. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही प्राप्त झाली. तक्रारीवरून अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी सज्ज झाले. तत्कालीन अधिका-यांनी कारवाईला बगल दिली. मनपाने दोन वर्षांपूर्वीच रुग्णालयावर कारवाई केली असती तर आग लागलीच नसती.
शहरातील रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम अग्निशमन विभागाने करणे अपेक्षित आहे. रुग्णालयांमध्ये खाजगी एजन्सीकडून अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येते. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर मनपाचा अग्निशमन विभाग संबंधित इमारतमालकाला एनओसी देतो.
जागेवर अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही, हे तपासण्याची तसदीही अग्निशमन विभाग घेत नाही. मोठमोठ्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारून देणा-या एजन्सीही मनपा अधिकाºयांच्या नातेवाईकांच्याच आहेत. त्यामुळे आजपर्यंत सर्व ‘खेळ’सुरळीतपणे सुरू आहे.