धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:43 PM2017-11-17T23:43:01+5:302017-11-17T23:43:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील धार्मिक स्थळांची दोन ठिकाणची अतिक्रमणे शुक्रवारी नागरिकांनी स्वत:हून तर पाच ठिकाणची अतिक्रमणे मनपाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील धार्मिक स्थळांची दोन ठिकाणची अतिक्रमणे शुक्रवारी नागरिकांनी स्वत:हून तर पाच ठिकाणची अतिक्रमणे मनपाच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्तात हटविली.
सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती. शहरात २० ठिकाणी अशी अतिक्रमणे आहेत. त्यातील ७ अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी कारवाई करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, आयुक्त राहुल रेखावार यांच्या जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दुपारी ३ वाजेनंतर गुजरी बाजार भागापासून अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली.
या भागातील दोन धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाची जागा मनपाच्या पथकाने निश्चित करुन दिली. त्यानंतर नागरिकांनी स्वत:हूनच ही अतिक्रमणे हटविली. त्यानंतर मनपाचे पथक जुना कारेगावरोड कृषी सारथी कॉलनी भागात गेले. तेथे एक ध्वज व अन्य एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण नागरिकांशी चर्चा करुन मनपाच्या पथकाने हटविले. त्यानंतर हे पथक शनिवार बाजार भागात दाखल झाले.
या भागातील धार्मिक स्थळाचे समोरील शेड चर्चेअंती काढून घेण्यात आले. त्यानंतर शास्त्रीनगर, पाथरी रोड भागातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण मनपाच्या पथकाने हटविले. दिवसभरात मनपाने पाच ठिकाणचे तर नागरिकांनी स्वत:हून दोन ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यावेळी आयुक्त राहुल रेखावार, उपमहापौर माजूलाला, अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख तथा मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, सय्यद इम्रान, विजय मोहरीर, मीर शाकेर अली, शिवाजी जाधव, रईस खान, आर.एस.खान, विकास रत्नपारखी, राजू झोडपे, श्रीकांत कुºहा, शेख शादाब आदींची उपस्थिती होती.
मोहिमेच्या प्रारंभी आ.डॉ.राहुल पाटील यांनी गुजरी बाजार भागातील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. मनपाची ही मोहीम शांततेत पार पडली.
शाळांना दिली सुटी
४१७ नोव्हेंबर रोजी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार असल्याने या संदर्भात १७ नोव्हेंबर रोजीच अचानक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दुपारच्या सत्रात शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्याचे आदेश प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व मनपा आयुक्तांना दिले. त्यानुसार शहरातील सर्व शाळा सोडून देण्यात आल्या. अचानक शाळांना सुटी देण्यात आल्याने नागरिकही चकित झाले होते.
सकाळपासून पोलीस बंदोबस्त
४अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात येणार असल्याचे १३ नोव्हेंबर रोजीच निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस कर्मचाºयांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास ७०० पोलीस कर्मचारी याकामी नियुक्त करण्यात आले होते. शिवाय शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी हे स्वत: शहरातील विविध भागात भेटी देत असल्याचे पाहावयास मिळाले.