अतिक्रमण हटाव विभागाचा अहवाल,‘आम्ही शहरातील केबल काढलीय...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:49 AM2020-03-09T11:49:20+5:302020-03-09T11:49:47+5:30
एकाही खांबावरील केबल वायर मनपाने काढली नाही
औरंगाबाद : कॅनॉट भागात विद्युत पथदिव्यांवर आजही केबलचे जाळे विखुरलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के केबल काढल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. या अहवालाच्या आधारे वरिष्ठांनीही खंडपीठात २०० किलोमीटर केबल काढल्याचे शपथपत्र देऊन टाकले. न्यायालयानेही २०० कि.मी. केबल आणून दाखवा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. केबल न काढताच अहवाल कोणी दिला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी विद्युत विभागाला शहरातील पथदिव्यांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका रात्रीतून तब्बल ४० हजार पथदिव्यांचे सर्वेक्षण करून अहवाल थेट आयुक्तांना सादर केला होता. हा अहवाल पाहून आयुक्तांचे डोळे पांढरे झाले होते. अलीकडेच शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे किती याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले. वॉर्डनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ हजार खड्डे असल्याचा अहवाल एका रात्रीतून दिला होता. आकड्यांचे गणित मांडण्यात अख्खी महापालिकाच पटाईत आहे. आता खंडपीठाने शहरातील पथदिव्यांवरील केबल काढण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज १५, २० किलोमीटर केबल काढण्यात आल्याचा लेखी अहवाल दिला. या अहवालाच्या आधारावर विद्युत विभागाचे प्रमुख ए.बी. देशमुख यांनी २०० कि.मी. केबल काढल्याचा दावा खंडपीठात शपथपत्राद्वारे केला. आता खंडपीठाने जप्त केलेली केबल आणून दाखवा म्हटले, तर मनपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
शनिवारपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोबकळणाऱ्या केबल जप्त करण्याचे काम सुरू केले. कॅनॉट परिसरात तर १०० टक्के केबल काढण्यात आल्याचा दावा अतिक्रमण हटाव विभागाने केलेला आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात पाहणी केली असता कॅनॉट भागात केबलचे जाळे जशास तसे आहे. एकाही पथदिव्यावरील केबल काढलेली नाही. उलट धोकादायक पद्धतीत लोंबकळणाऱ्या केबलचे प्रमाण सर्वाधिक आहे.