हिमायतबाग चौकातील अनधिकृत चायनीज केंद्रावर फिरवला ‘देशी वरवंटा’
By मुजीब देवणीकर | Published: June 20, 2024 06:11 PM2024-06-20T18:11:36+5:302024-06-20T18:11:49+5:30
चायनीज हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर आसपासच्या चार टपऱ्याही जप्त करण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर : हिमायतबाग चौकात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले १५ बाय १२ आकाराचे चायनीज सेंटर मागील वर्षी मनपाने पाडले हाेते. मनपाच्या कारवाईला न घाबरता पुन्हा त्याच ठिकाणी दिमाखात मोठे चायनीज सेंटर उभारले होते. या सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना, वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. बुधवारी मनपाने पोलिस बंदोबस्तात पुन्हा कारवाईचा वरवंटा फिरवला.
बुधवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या सामासिक अंतरात चायनीज सेंटर उभारले होते. सामान काढण्यासाठी काही वेळ देण्यात आला. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी काही सामान काढून बाजूला ठेवले. अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, अशी सूचना मनपाकडून देण्यात आली होती. मात्र, संबंधितांनी अतिक्रमण काढले नाही. महापालिकेने बेगमपुरा पोलिसांना सोबत घेऊन सकाळी कारवाई सुरू केली.
चायनीज हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर आसपासच्या चार टपऱ्याही जप्त करण्यात आल्या. यातील एका टपरीत काचेच्या बांगड्या विकण्यात येत होत्या. विक्रेत्याच्या लहान मुली बांगड्या फुटणार नाहीत, याची काळजी घेत होत्या. याच एका टपरीवर संबंधित कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनवणे, पद निर्देशित अधिकारी अशोक गिरी, कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक अश्विनी कोथळकर, सय्यद जमशीद, पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्यासह पथकाने कारवाई केली.
एन-७ येथेही कारवाई
सिडको एन-७ येथे व्ही. डी. देशपांडे सभागृहाच्या बाजूला एका व्यक्तीने नाल्याच्या जागेवर पंधरा बाय पंधरा आकाराच्या पत्र्याच्या दोन खोल्या बांधल्या होत्या. हे अतिक्रमणही मनपाच्या पथकाने काढले. हे अतिक्रमण काढण्यासाठी मनपाला सिडको पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागला.