वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:53 PM2018-12-15T17:53:53+5:302018-12-15T18:35:39+5:30
वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चार महिन्यांतच अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली आहेत.
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्यामुळे या परिसरातील विविध सेक्टर व मुख्य चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चार महिन्यांतच अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली आहेत.
सकल समाजाच्यावतीने चार महिन्यांपूर्वी ९ आॅगस्टला पुकारण्यात आलेल्या बंदला वाळूज उद्योगनगरी हिंसक वळण लागले होते. या बंदच्या आडून समाजकंटकांनी उद्योगनगरीत बहुताश कंपन्याला टार्गेट करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. या घटनेमुळे उद्योजक संघटनांनी समाजकंटकावर कारवाई करण्यासह अतिक्रमणे हटविण्याची मागणी एमआयडीसी व पोलीस प्रशासनाकडे लावून धरली होती. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने वाळूज उद्योगनगरी तसेच बजाजनगरात अतिक्रमणे हटवून जवळपास दीड हजार अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली होती.
या कारवाईचा धसका घेत अनेक अतिक्रमणधारकांनी नुकसानीच्या भितीमुळे स्वत:हून अतिक्रमणे हटविली होती. यामुळे विविध सेक्टर व चौकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, आता पुन्हा अतिक्रमणे वाढू लागली आहेत. आजघडीला उद्योनगरीत कामगार चौक, एफडीसी चौक, महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, रांजणगावरोड, सीएट रोड, एनआरबी चौक आदी ठिकाणी तसेच विविध सेक्टरमध्ये हॉटेल व टपऱ्यांची अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. या परिसरातील अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पावले उचलली जात असल्याचे एमआयडीसी विभागातील सूत्रांनी सांगितले.
अतिक्रमणांमुळे उद्योजकांत नाराजी
वाळूज उद्योनगरीत पुन्हा अतिक्रमण वाढत चालल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश अतिक्रमणधारक मोकळे भूखंड व रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहने, उद्योजक, कामगार व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अब्दुल शेख, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड, जगदीश जोशी, दिंगबर मुळे, अर्जुन आदमाने आदींनी व्यक्त केल्या आहेत.