पोहण्यास गेलेल्या मुलाचा अंत
By Admin | Published: July 25, 2016 12:15 AM2016-07-25T00:15:54+5:302016-07-25T01:05:20+5:30
औरंगाबाद : सिडको एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.
औरंगाबाद : सिडको एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिकेत रामदास अहिरे (१५, रा. लोकशाही कॉलनी, मुकुंदवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, सिडको एमआयडीसीमधील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील खुल्या परिसरात असलेल्या खड्ड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या कॉलनीत राहणारा अनिकेत हा दहावीमध्ये शिकत होता. रविवारी शाळेला सुटी असल्याने तो मित्रासह एमआयडीसी एरियात फिरायला गेला. त्यावेळी त्यास पाण्याचे मोठे डबके दिसले. या डबक्यात पोहण्याचा मोह त्यास आवरला नाही आणि त्याने पाण्यात उडी मारली. मात्र तो पाण्यात बुडाला. अनिकेतला पाण्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी अनिकेत यास तपासून ३.१५ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले.
या घटनेची माहिती लोकशाही कॉलनीत कळताच नागरिकांनी अनिकेतच्या घरी गर्दी केली. अनिकेतचे आई-बाबा भंगार जमा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्याच्या मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. आता अनिकेतच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असल्याची माहिती नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी दिली.